तासगाव कारखान्याच्या एकरकमी एफआरपीसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:31 IST2021-01-08T05:31:58+5:302021-01-08T05:31:58+5:30
पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत तासगाव पोलीस ठाण्यात, तासगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील आणि स्वाभिमानी ...

तासगाव कारखान्याच्या एकरकमी एफआरपीसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक
पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत तासगाव पोलीस ठाण्यात, तासगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची समन्वयाबाबत बैठक झाली. मात्र या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.
संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी शेतकऱ्यांना २८५० रुपये याप्रमाणे एकरकमी एफआरपी देण्याची आक्रमक भूमिका घेतली. कारखाना प्रशासनाने कोणतेही कारण न देता शेतकऱ्यांची बांधीलकी ठेवून शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घ्यायला हवी. सोनहिरा, उदगीर, दालमिया या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तासगाव कारखान्यांनी ही एकरकमी एफआरपी द्यायलाच हवी अशी भूमिका घेतली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी अन्य कारखान्यांच्याप्रमाणे तासगाव कारखानाही निर्णय घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घेईल, अशी भूमिका घेतली. कारखान्याकडून एकरकमी एफआरपी देण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. एकरकमी एफआरपी न मिळाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करून शेतकऱ्यांचे हित साधले जाईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष जोतीराम जाधव यांनी यावेळी दिला. बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ झाली.
पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी कायदा व सुव्यवस्था राखून शेतकऱ्यांचे हित साधले जावे, असे आवाहन केले. बैठकीस दामाजी डुबल, धन्यकुमार पाटील, सुधीर जाधव, संदेश पाटील, शशिकांत माने, माणिक शिरोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.