डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई शक्य
By Admin | Updated: December 22, 2014 00:17 IST2014-12-22T00:14:52+5:302014-12-22T00:17:36+5:30
खंडेराजुरीत प्रसुतीकडे दुर्लक्ष : ‘सीईओं’च्या निर्णयाकडे लक्ष

डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई शक्य
सांगली : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी आणि पाच आरोग्यसेविका व सेवकांना निलंबित का करू नये, अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावली आहे. या सर्वांवर उद्या (सोमवारी) कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गुरुवारी खंडेराजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिला प्रसुतीसाठी आली होती. त्यावेळी आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे संबंधित महिलेची प्रवेशद्वारातच प्रसुती झाल्याचा आरोप पंचायत समिती सदस्यांनी केला होता. याप्रकरणी ताालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधू पाटील यांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्याकडे अहवाल सादर केला. या अहवालाच्याआधारे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी आरोग्य केंद्रातील डॉ. ए. आर. गुरव, डॉ. डी. बी. कांबळे, आरोग्यसेविका सौ. एस. बी. तांबे, ई. एस. मुल्ला, एम. एस. पाटील, आरोग्यसेवक एम. एस. गोपाल यांच्यावर दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई का करू नये, अशी नोटीस बजाविली आहे. या सर्वांना खुलासा देण्याची मुदत उद्या, सोमवारी संपत आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)