खंडेराजुरीत सहा कर्मचारी निलंबित-- संघटनेची फिरकी
By Admin | Updated: December 24, 2014 00:20 IST2014-12-24T00:16:28+5:302014-12-24T00:20:55+5:30
दहाजण दोषी : प्रसूतीस आलेल्या महिलेकडे दुर्लक्षप्रकरणी कारवाई

खंडेराजुरीत सहा कर्मचारी निलंबित-- संघटनेची फिरकी
सांगली : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन आरोग्य सेविकांसह अन्य चार कर्मचाऱ्यांना आज, मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी निलंबित केले. आरोग्य केंद्रातील डॉ. ए. आर. गुरव, डॉ. डी. बी. कांबळे या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही दोषी धरण्यात आले असून, त्यांच्या निलंबनाची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये बाराजणांची चौकशी करण्यात आली असून त्यातील दहाजण दोषी आढळले आहेत.
खंडेराजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी एक महिला प्रसूतीसाठी आली होती. त्यावेळी आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे संबंधित महिला प्रवेशद्वारातच प्रसूत झाली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांतून करण्यात आली होती. याप्रकरणी खुलासा देण्यासाठी दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह बाराजणांना सतीश लोखंडे यांनी नोटिसा बजावल्या होत्या. बारा कर्मचाऱ्यांनी खुलासा दिला. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका अधिकाऱ्यांचे मत घेण्यात आले होते. त्यानंतर आज त्यातील सहा जणांना निलंबित करून दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली.
संघटनेची फिरकी
या प्रकरणामध्ये सरसकट कारवाई करण्यात येऊ नये, या मागणीसाठी कर्मचारी संघटनेचे नेते मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या. वैयक्तिक सूचनाही देण्यात आल्या. गैरशिस्त खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्यावर अन्याय झाला आहे, असे त्यांना वाटल्यास ते स्वत: माझ्यासमोर उपस्थित राहिले असते, असे लोखंडे यांनी बजावले. कोणावरही विनाकारण कारवाई होणार नाही आणि दोषींना खपवूनही घेतले जाणार नाही, असेही त्यांनी संघटनेला सुनावले.