सांगली : खुनी हल्ल्यासह तब्बल १३ गुन्हे दाखल असलेल्या आणि ‘मोका’तून जामिनावर सुटलेल्या पवन धर्मेंद्र साळुंखे (वय २५, रा. वाल्मीकी घरकुल) याने कोयत्यासह दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचारी वासिमअक्रम नुरखान मुलाणी (वय ३२) कारवाईस गेल्यानंतर त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. शहर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.पवन साळुंखे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर जबरी चोरी, आर्म ॲक्ट, खुनी हल्ला असे गंभीर स्वरूपाचे १३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ‘मोका’ अंतर्गत कारवाईदेखील करण्यात आली होती. ‘मोका’तून तो बाहेर आला आहे. गुरुवारी सायंकाळी तो वाल्मीकी आवास घरकुल परिसरात दहशत माजवत होता. शहर पोलिसांना माहिती मिळताच कारवाईसाठी पोलिस रवाना झाले. पोलिस कर्मचारी वासिमआक्रम मुलाणी हे घटनास्थळी आल्यानंतर पवन याने ‘पोलिस माझे काय वाकडे करणार?’ असे म्हणून मुलाणी यांना धक्काबुक्की करत बुक्कीने तोंडावर मारले. त्याला अडवत असताना शिवीगाळ करून कमरेला लावलेला काेयता त्यांच्यावर उगारला. शिवीगाळ करत ‘तुला भोसकतो’ असे म्हणून धमकी दिली. यावेळी इतर पोलिसांच्या मदतीने पवनला ताब्यात घेतले. त्याला सांगली शहर पोलिस ठाण्यात आणले. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तसेच भारतीय शस्त्र अधिनियमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीत ‘मोका’ तील संशयिताची पोलिसाला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:42 IST