सांगली कारागृहात संशयिताची गळफासाने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:12+5:302021-05-07T04:29:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील जिल्हा कारागृहात चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयिताने बाथरूममध्ये टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली. ...

सांगली कारागृहात संशयिताची गळफासाने आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील जिल्हा कारागृहात चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयिताने बाथरूममध्ये टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली. दीपक आबा आवळे (वय २०, रा. इंदिरानगर, सांगली), असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
सांगली शहर पाेलीस ठाण्यासह तासगावमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने संशयित दीपक यास अटक करण्यात आली होती. सांगली शहरातील इंदिरानगरमध्ये आई व भावासह तो राहण्यास होता. दीपकला सहा महिन्यांपासून जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. कारागृहात असलेल्या बाथरूमध्ये बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने टॉवेलने गळफास घेतला. इतर बंदिवान बाथरूमकडे गेल्यानंतर आत्महत्येचा प्रकार लक्षात आला. कारागृह अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धाव घेत वैद्यकीय पथकालाही पाचारण केले. यावेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
त्यानंतर कारागृह प्रशासनाने न्यायाधीश, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्यासमोर पंचनामा पूर्ण केला. इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला होता. तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सांगली शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
चौकट
दीपकला होती सुधारण्याची इच्छा
काही दिवसांपूर्वीच मृत दीपकने कुटुंबीयांना व मित्रांना उद्देशून पत्र लिहिले होते. या पत्रात त्याने, ‘कुणीही गुन्हा करू नका, ही दीपकची इच्छा आहे. कारण जेलमधील दिवस खूप वाईट असतात. मी इथे बरा आहे. येथून बाहेर पडल्यानंतर मी सुधारेन की नाही माहीत नाही; पण मला सुधारण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी काही दिवस मला सांगलीबाहेर राहावे लागेल’, असे लिहीत त्याने कुटुंबीयांना काळजी घेण्याची विनंती केली होती.