सुनीताचा प्रवास खमंग चवीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:42+5:302021-03-07T04:22:42+5:30

विश्रामबागेत शंभर फुटी रस्त्याला काहीतरी फास्ट फूड खाण्यासाठी म्हणून गेलात की, पावले आपसुकच वळतात बालाजी डोशाकडे. तेथे फास्ट फुडचे ...

Sunita's journey is delicious | सुनीताचा प्रवास खमंग चवीचा

सुनीताचा प्रवास खमंग चवीचा

Next

विश्रामबागेत शंभर फुटी रस्त्याला काहीतरी फास्ट फूड खाण्यासाठी म्हणून गेलात की, पावले आपसुकच वळतात बालाजी डोशाकडे. तेथे फास्ट फुडचे रंगरुप ल्यालेले पण अस्सल गावरान चवीचे हरतर्हेचे पदार्थ तव्यावर लागोपाठ तयार होत असतात. दरवळ अख्ख्या चौकात मावत नसतो. ग्राहकांच्या फर्माईशी पुऱ्या करेपर्यंत मायलेकांना उसंत नसते. जिभेवर पसरून राहिलेल्या स्वादाने खूश होणारा एखादा दर्दी खवय्या विजापुरी थालीपिठाचे मनसोक्त कौतुक करतो, तेव्हा त्याला हसून प्रतिसाद देत मायलेक पुढच्या फर्माइशीकडे वळतात. दुपारी तीन-चारला सुरू झालेली ही धांदल रात्री दहा-अकरा वाजता कधीतरी थंडावते, संपत मात्र नाही. उद्या सकाळच्या मेन्यूसाठी पुन्हा तयारी करेपर्यंत मध्यरात्र कधी उलटली हेदेखील कळत नाही.

तर अशी ही बालाजी डोश्याच्या सुनीता बिराजदार यांच्या अखंड धावपळीची झलक. `थांबून चालायचे कसे?` हा सुनीता यांचा प्रश्नच संघर्षमय वाटचालीची कहाणी सांगतो. बोलण्यातील लाघव हातातही उतरलीय. प्रत्येक पदार्थ खमंगच. साधे आपेदेखील साजुकपणाने खाणाऱ्याच्या मनाचा तळ गाठणारे. `ही वाटचाल सोपी नव्हती`, सुनीता बिराजदार सांगतात, `२५-३० वर्षांपूर्वी पोटासाठी गाव, घरदार सोडले तेव्हा पुढे काय हे ठरलेले नव्हते. विजापूरजवळच्या बसवन बागेवाडीतून सांगलीला आलो. जगण्याचा संघर्ष अगदी मराठी भाषा बोलण्यापासून सुरू होता. शिक्षण दोन-चार इयत्तेपुरतेच, त्यामुळे औद्योगिक वसाहतीत पडेल ते काम पत्करले. पोटाचा प्रश्न मिटला; पण जगण्याचे समाधान नव्हते. पदरात तीन मुले होती. कारखान्यातील कामातून सुखाचे दिवस येण्याची चिन्हे नव्हती. एके दिवशी तडकाफडकी काम सोडले. पुढे मात्र सगळाच अंधार होता`.

सुनीता सांगत राहतात, `कामावर सगळेच माझ्या डब्यातील भाजीचे कौतुक करायचे. सणासुदीला स्पेशल काहीतरी असायचे तेव्हा डबा माझा राहायचा नाही. कर्नाटकी स्वादाचे पदार्थ सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणायचे. तुझ्या हातात अन्नपूर्णा आहे असे तोंडभरून कौतुक मिळायचे. काम सोडल्यावर मनात विचार चमकला, या अन्नपूर्णेलाच जगण्याचे साधन का बनवू नये? मुलगा संतोषला मदतीला घेतले. सांगलीत शंभर फुटीला गाडा टाकला. हाताला स्वाद होता; पण व्यवहार शिकून घ्यावा लागला. आज माझ्या हातचे थालीपीठ शेकडो सांगलीकर मिटक्या मारत खातात. कर्नाटकी थालीपिठावर चीज पसरून बनविलेले चीज थालीपीठ लहानांच्याही पसंतीला उतरलेय. स्प्रिंग डोसा, चॉकलेट डोसा, स्पेशल डोसा अशी व्हरायटी आणल्याने स्पर्धेत टिकता आले. या अन्नपूर्णेने माझे घर सावरले. स्वाभिमानाने जगायला शिकविले. मुला-मुलींचे शिक्षण, लग्ने केली. या कामात कष्ट आहेत; पण समाधानही आहे`.

सुनीता यांची जीवनाची शाळा इतर अनेक महिलांना स्वावलंबनाचा रस्ता दाखविणारी ठरली आहे. संकटांपुढे हार न मानता संघर्ष करायला शिकवणारी ठरली आहे.

Web Title: Sunita's journey is delicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.