संडे स्पेशल - जगण्याची उमेद वाढविणारी आयुष संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST2021-04-18T04:24:37+5:302021-04-18T04:24:37+5:30
आपत्कालीन प्रसंगी मदतीचा हात देणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था जिल्ह्यात आहेत. महापुरासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी या संस्थांनीच सांगलीला सावरण्यास मदत केली. ...

संडे स्पेशल - जगण्याची उमेद वाढविणारी आयुष संस्था
आपत्कालीन प्रसंगी मदतीचा हात देणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था जिल्ह्यात आहेत. महापुरासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी या संस्थांनीच सांगलीला सावरण्यास मदत केली. जगण्याची उमेद वाढविली. पण कोरोनाचा संकटकाळ अत्यंत वेगळा ठरला. फक्त अन्नपाणी किंवा आर्थिक मदतीपेक्षाही आरोग्यसेवा महत्त्वाची ठरली. सलग दीड वर्ष कोरोनाविरुद्ध लढ्यात मोजक्याच संस्था टिकल्या. कुपवाडची आयुष सेवाभावी संस्था त्यापैकीच एक.
संस्थेला सामाजिक कामाची पार्श्वभूमी असल्याने कोरोनाच्या लढ्यातही ती टिकून राहिली. समाजातील अनेक दात्यांनी आयुषच्या हातात हात मिळविले. सुरुवातीला कामाची नेमकी दिशा स्पष्ट नव्हती. त्यामुळे नेहमीप्रमाणे गरजू व बेरोजगारांच्या अन्नपाण्याच्या व्यवस्थेवरच भर राहिला. रोगप्रतिकारक औषधांचे वाटप केले. पण चरितार्थापेक्षा आरोग्यसेवा महत्त्वाची असल्याचे लवकरच लक्षात आले. त्यातूनच मोबाईल फिवर क्लिनिक सुरू झाले. घरोघरी संशयितांच्या तपासण्या सुरू केल्या.
रुग्णसंख्या वाढू लागताच व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवू लागला. बेडअभावी रुग्णांचे हाल सुरू झाले. त्यामुळे संस्थेने पोर्टेबल ऑक्सिजन यंत्रे उपलब्ध केली. ती आता रुग्णांना घरोघरी वापरायला विनाशुल्क दिली जात आहेत. याचा मोठा फायदा होत आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने प्राण कंठाशी येऊ पाहणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळत आहे. घरच्या घरी प्राणवायूची पातळी स्थिरावल्याने रुग्णालयांवरील ताणही कमी होत आहे. घरगुती विलगीकरणातील रुग्णांना संस्थेचे डॉक्टर कार्यकर्ते घरात जाऊन वैद्यकीय सेवा देत आहेत.
रुग्णाला व नातेवाईकांना मानसिक समुपदेशनाची प्रचंड गरज असल्याचे या काळात लक्षात आले. त्यामुळे आयुषने हेल्पलाईन सुरू केली. रुग्णांचे समुपदेशन, ताण, तणाव, नैराश्य कमी करण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन, मानसिक आधारासाठी मदत देण्याचे काम त्याद्वारे सुरू आहे. संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, रितेश शेठ, अविनाश पवार, अजित कांबळे, गणेश आनंदे, डॉ. दशरथ सावंत, डॉ. ओंकार माळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सामाजिक उपक्रमात सहभागी आहेत.