सांगलीत पोलिस अंमलदाराने आयुष्य संपविले; कारण अस्पष्ट, शहर पोलिसांत नोंद
By शीतल पाटील | Updated: September 25, 2023 20:45 IST2023-09-25T20:38:39+5:302023-09-25T20:45:10+5:30
तरूण पोलिस अंमलदाराने आत्महत्या केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सांगलीत पोलिस अंमलदाराने आयुष्य संपविले; कारण अस्पष्ट, शहर पोलिसांत नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहर पोलिस ठाण्याकडील अंमलदार वसीम मुसा अत्तार (वय ४२, रा. मुजावर प्लॉट, बसस्थानक परिसर, सांगली) यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसीम अत्तार हे मिरजेतील महात्मा गांधी पोलिस चौकीत कार्यरत होते. चार महिन्यापुर्वी त्यांची सांगली शहर पोलिस ठाण्यात बदली झाली होती. रविवारी ते ड्युटीवरून घरी परतले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तरूण पोलिस अंमलदाराने आत्महत्या केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.