दाखल्यांसाठी कवठेमहांकाळ सेतुमध्ये विद्यार्थ्यांचे हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:08+5:302021-02-11T04:28:08+5:30
शिरढोण : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी व पालक विविध दाखल्यांसाठी कवठेमहांकाळ येथील सेतूत कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. सरकारी कारभार धिम्यागतीने ...

दाखल्यांसाठी कवठेमहांकाळ सेतुमध्ये विद्यार्थ्यांचे हेलपाटे
शिरढोण : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी व पालक विविध दाखल्यांसाठी कवठेमहांकाळ येथील सेतूत कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. सरकारी कारभार धिम्यागतीने सुरू असल्याने पंधरा ते वीस दिवस दाखले मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे हाल सुरू आहेत.
जिल्हा परिषद शाळांपासून ते महाविद्यालय आणि नोकरीच्या कामासाठी जातीचे दाखले व नॉनक्रिमिलेअर दाखले यांची गरज लागते. जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाने जातीवर्गाप्रमाणे शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्न दाखला आणि राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यार्थ्यांचे खाते आदी कागदपत्रे आवश्यक केली आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी त्याच्या सोयीनुसार प्रत्येक गावे वाटून घेतले आहेत. त्यामुळे शहरात असलेल्या बँकेच्या शाखेत ग्रामीण भागातून आलेल्या पालकांना त्यांना वाटून दिलेल्या बँक शाखेत जावा असे सांगितले जाते; तर संबंधित बँकेत गेल्यावर पुन्हा विविध कारणांतून टोलवाटोलवी सुरू आहे.
गावाकडून दहा ते १५ किलोमीटचे अंतर कापून तालुक्यात यायचे आणि पुन्हा हात हालवत परत जायचे असे प्रकार सध्या सुरू आहेत. विविध दाखले मिळविण्यासाठी वीस दिवस घालवावे लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकवाले एकमेकांच्या बँकेत पाठवत आहेत. या हेलपाट्यांमध्येच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याची मुदत संपत आली आहे.
चौकट
बँकांचे धोरण काय?
कवठेमहांकाळ शहरातील व तालुक्यातील बँकांनी परस्पर त्यांच्या म्हणण्यानुसार कोणताही शासकीय जीआर नसताना जवळची गावे वाटून घेतली आहेत. शहरातील बँकेत गेले की ग्रामीण भागातील बँकेत पाठविले जाते. अशा वागणुकीमुळे बँकेचे नेमके धोरणे काय असा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी पालकांची मागणी आहे.