शेटफळेत तरुणांचा दुष्काळ मुक्तीसाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:16 IST2019-04-03T23:16:02+5:302019-04-03T23:16:06+5:30
लक्ष्मण सरगर । लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळेतील तरुणवर्ग खांद्यावर कुदळ आणि फावडे घेत दुष्काळ मुक्तीसाठी ...

शेटफळेत तरुणांचा दुष्काळ मुक्तीसाठी संघर्ष
लक्ष्मण सरगर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळेतील तरुणवर्ग खांद्यावर कुदळ आणि फावडे घेत दुष्काळ मुक्तीसाठी सज्ज झाला आहे. पानी फौंडेशनच्या माध्यमातून गावाला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शेकडो तरुण सरसावले आहेत.
राज्यकर्त्यांनी दुष्काळाकडे पाठ फिरवून निवडणुकीचा बाजार भरविला असताना, शेटफळेतील युवकांनी मात्र निवडणुकीच्या रणांगणाऐवजी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी गावात श्रमदानातून पाण्याचे रणांगण पेटविले आहे. शेटफळे गावातील शेकडो तरुण एकत्र येऊन कायमस्वरूपी दुष्काळावर मात करण्यासाठी राबत आहेत. पानी फौंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत शेटफळे गावाने सहभाग नोंदविला आहे. गावामध्ये पडलेले पावसाचे पाणी वाहून न जाता ते अडवून जमिनीत मुरविण्यासाठी युवा वर्ग कष्ट घेत आहे. पानी फौंडेशनच्या कार्यक्रमाअंतर्गत गावातील नागरिकांच्यात प्रथम मनसंधारण करून नागरिकांना जलसंधारणाकडे नेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम युवा वर्ग राबवित आहे. गावातील प्रत्येक चौक व वाड्या-वस्त्यांवर जाऊन पाणीदार झालेल्या गावांच्या चित्रफिती दाखविल्या जात आहेत. अनेक युवक, ज्येष्ठ मंडळी व गावकरी ग्रामस्वच्छतेतून एकत्र येत आहेत.
स्मशानभूमीत वृक्षारोपण
ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून गावातील तरुणांनी एकत्र येत स्मशानभूमीची स्वच्छता करून वृक्षारोपण करत सामाजिक संदेश दिला आहे. दुष्काळी परिस्थितीला निसर्गाबरोबरच शासनकर्तेही जबाबदार आहेत. मात्र शासनकर्त्यांवर विसंबून न राहता दुष्काळ मिटविण्यासाठी युवकांनी घेतलेल्या पुढाकाराने दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत होईल, हे निश्चित. सध्याच्या राजकीय धुळवडीत देशातील युवा वर्ग धुंद असला तरी, शेटफळेतील युवा वर्ग दुष्काळाच्या वणव्यातून बाहेर पडण्यासाठी झगडतो आहे.