विद्यापीठ उपकेंद्राचा संघर्ष पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:29+5:302021-06-29T04:18:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात मंजूर झाल्याने खानापूर घाटमाथा आक्रमक झाला आहे. कोणत्याही ...

The struggle of the university sub-center will ignite | विद्यापीठ उपकेंद्राचा संघर्ष पेटणार

विद्यापीठ उपकेंद्राचा संघर्ष पेटणार

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात मंजूर झाल्याने खानापूर घाटमाथा आक्रमक झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत उपकेंद्र खानापुरातच व्हावे यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींसह विद्यार्थी व सामाजिक संस्थांनी कंबर कसली आहे.

विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी करण्यासाठी २०१४ ला समिती गठित करण्यात आली होती. त्यावेळी या समितीने खानापूर व पेड या दोन गावांतील जागांची पाहणी केली. त्यानंतर समितीने खानापूर येथील जागा सोईस्कर असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडे २०१५ ला उपकेंद्राच्या उभारणीसाठी जागा आरक्षित करण्याचे पत्र दिले. मात्र, त्याबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या समितीने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन जागा आरक्षित करण्याची आठवण करून दिली. परंतु, या उपकेंद्राच्या उभारणीचा प्रश्न प्रलंबित राहिला.

दरम्यानच्या काळात तासगाव तालुक्यातील काही नेतेमंडळींनी हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात, तर काहींनी सांगलीला करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान केल्या. याची माहिती खानापूर घाटमाथ्यावर समजताच सर्वपक्षीय कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आक्रमक झाले. त्यांनी तातडीची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत हे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे, यासाठी एकजूट केली. मात्र नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात करण्यासाठी मान्यता दिली. त्यामुळे खानापूरचा घाटमाथा पुन्हा आक्रमक झाला आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित बैठक घेऊन तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकट :

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

तासगाव येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवावा लागणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विधिमंडळात ताकदीने मांडण्यासाठी आ. अनिल बाबर यांना खानापूर उपकेंद्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाने साकडे घातले आहे, तर महाआघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे याबाबतची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. सदाशिवराव पाटील यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: The struggle of the university sub-center will ignite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.