आटपाडीत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:25+5:302021-06-27T04:18:25+5:30
आटपाडी : जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ८ पैकी ६ आमदार निवडून येण्यासाठी पक्षसंघटन मजबूत करत सर्वांनी कामाला लागावे. भाजपसह इतर पक्षात ...

आटपाडीत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा
आटपाडी : जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ८ पैकी ६ आमदार निवडून येण्यासाठी पक्षसंघटन मजबूत करत सर्वांनी कामाला लागावे. भाजपसह इतर पक्षात गेलेले आपले जुने सहकारी आपल्याकडे येऊ लागले आहेत. आगामी काळात पक्षात येणाऱ्या सर्वांना सामावून घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अविनाश पाटील म्हणाले, सामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादीची आहे. देशपातळीवरचे राजकीय वातावरण बदलत आहे. सर्वांच्या नजरा शरद पवार यांच्यावर एकवटल्या आहेत. यामुळे आता पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, तालुक्यातील आगामी सर्व निवडणुका पक्ष स्वबळावर लढवणार आहे. तालुक्यात पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत.
युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील यांनी युवकांच्या संघटित ताकदीने तालुक्यात पक्षाला गती देणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांनी सर्वांना एकत्र करून खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून यावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी ॲड. बाबासाहेब मुळीक, विराज नाईक, सुश्मिता जाधव, सादिक खाटीक, पूजा लाड, प्रा. एन. पी. खरजे, अनिता पाटील, अश्विनी अष्टेकर-कासार, जालिंदर कटरे, आदी उपस्थित होते.