जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:54+5:302020-12-09T04:22:54+5:30

सांगली : केंद्र शासनाने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ...

Strictly closed in the district | जिल्ह्यात कडकडीत बंद

जिल्ह्यात कडकडीत बंद

सांगली : केंद्र शासनाने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंद पाळून शासनाच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी रॅली, सभा घेऊन आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी व शहरी भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य बाजारपेठा, चौक, रस्ते दुपारपर्यंत ओस पडले होते. आंदोलनामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी बससेवा विस्कळीत झाली. आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पक्ष, किसान सभा, कम्युनिस्ट पार्टी, आयटक, नागरिक जागृती मंच आदी पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी सांगलीत संयुक्त आवाहन करीत रॅली काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडविले. ही सर्वपक्षीय आवाहन रॅली अडविल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस कारवाईच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला, तर युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या पुतळा दहनाचा प्रयत्न केला.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीत सुरू केलेले आत्मक्लेश आंदोलन सुरूच आहे. निर्णय होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

सांगली, मिरज शहरांसह इस्लामपूर, आष्टा, जत, विटा, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस येथे उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी दुपारी तीननंतर बाजारपेठा खुल्या झाल्या. आंदोलनादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

चौकट

पोलिसांशी झटापट

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी पुतळा काढून घेतला. त्यामुळे पोलीस व कार्यकर्त्यांत झटापट झाली. त्यानंतर आंदोलकांनी केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: Strictly closed in the district