कुंडलला कडकडीत बंद, रास्ता रोको

By Admin | Updated: September 13, 2016 00:50 IST2016-09-13T00:08:32+5:302016-09-13T00:50:13+5:30

बालकावर अत्याचाराचा निषेध : संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी

Stop the horoscope, stop the way | कुंडलला कडकडीत बंद, रास्ता रोको

कुंडलला कडकडीत बंद, रास्ता रोको

कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथील नऊ वर्षाच्या बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी परिसरात उमटले. या घटनेचा निषेध करीत संशयित सचिन सुरेश पाटोळे याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत कुंडलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. कुंडल पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संतप्त जमावाने कुंडल फाट्यावर टायर पेटवून टाकून रास्ता रोको आंदोलन कले. दरम्यान, पोलिसांनी वेजेगाव (ता. खानापूर) येथे सापळा रचून संशयित आरोपीस ताब्यात घेतल्याचे सांगून, त्याच्यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कुंडल येथील नऊ वर्षाच्या शाळकरी मुलावर गावातीलच सचिन पाटोळे याने शुक्रवारी अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर गावात संतप्त पडसाद उमटले. गाव बंदची हाक देण्यात आली. कुंडल पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून, सचिन पाटोळे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संतप्त जमावाने कुंडल फाटा, तसेच घाटगे पुलावर टायर पेटवून टाकून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे दोन तास पलूस-कुंडल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
दुपारी १ वाजता संशयितास वेजेगाव (विटा) येथे सापळा रचून अटक करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पलूस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, गावातील महिला मंडळांनी पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांना निवेदन देऊन, आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली. यामध्ये देवांग समाजाच्या अध्यक्षा नंदाताई म्हेत्रे, सुमनताई गायकवाड, लोकशासनच्या अध्यक्षा मनीषा रोटे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करीत तीव्र निषेध केला.
क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा बॅँकेचे संचालक महेंद्र लाड, शरद लाड, योगेश लाड, अ‍ॅड. दीपक लाड, सर्जेराव पवार आदींनी निषेध व्यक्त करून संशयितास कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. (वार्ताहर)


रामोशी संघटनेकडून निषेध
पेठ येथील एम. एम. ग्रुप, राज्यस्तरीय रामोशी संघटनेच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. कुंडलमधील घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे प्रवक्ते अंकुश मंडले यांनी केली.


सांगलीहून फौजफाटा : कडेकोट बंदोबस्त
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनी तासगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्याकडून जादा पोलिस कुमक मागवून घेतली. संतप्त जमाव शांत होत नसल्याचे कळताच पलूसचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तासगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, डॉ. योगेश लाड कुंडल फाट्यावर दाखल झाले. संशयित आरोपी सचिन पाटोळे याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महसूल व पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर संतप्त जमाव नियंत्रणात आला. कुंडलमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सांगली येथून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांची तुकडी कुंडलला दाखल झाली.

Web Title: Stop the horoscope, stop the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.