लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका करीत भाजपच्या वतीने जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारविरोधात निदर्शनेही करण्यात आली.
सांगलीच्या कर्मवीर भाऊराव चौकात शनिवारी धरणे व रस्ता रोको आंदोलन पार पडले. यावेळी पोतराज, वासुदेव, वाघ्या मुरळी यांसह बारा बलुतेदारांची वेशभूषा करून लोक सामील झाले.
यावेळी आमदार गोपीचंद पळकर म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण मराठा समाजाचे आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करून सरकारने आपण बहुजनांच्या विरोधात आहोत, हे सिद्ध केले आहे.
पडळकर व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. सांगली शहराध्यक्ष अमर पडळकर यांनी याचे नियोजन केले होते. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, शेखर इनामदार, दीपक शिंदे, नीता केळकर, आदी सहभागी झाले होते.
चौकट
मिरज, कुपवाडलाही आंदोलन
ओबीसींच्या प्रश्नावर मिरजेत आमदार सुरेश खाडे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक सुरेश आवटी यांच्या नेतृत्वाखाली; कुपवाडला प्रकाश ढंग, गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
चौकट
जिल्ह्यात सर्वत्र निवेदने
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिराळ्यात, तासगावात सुनील पाटील, प्रमोद शेंडगे, विलास पाटील, हणमंत पाटील, नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, आदींच्या उपस्थितीत, आटपाडीत ब्रह्मदेव पडळकर, हर्षवर्धन देशमुख, डॉ. भूमिका बेरगळ, तानाजी यमगर, जयवंत सरगर, आदींच्या उपस्थितीत, जतला सुनील पवार, तम्मनगौडा रवी-पाटील, उमेश सावंत, प्रकाश माने, आदींच्या उपस्थितीत, नागज फाटा येथे सुभाष खांडेकर, सुरेश घागरे, दिलीप झुरे, मिलिंद कोरे, आदींच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
चौकट
इस्लामपुरात भाजपची दुफळी
इस्लामपुरात भाजपच्या दोन गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका भाजपच्या वतीने पेठ-सांगली महामार्गावर, तर याच विषयावर नगरसेवक विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन केले. पोलिसांनी पाटील यांच्यासह १०५ कार्यकर्त्यांसह अटक करून सुटका केली.