भेसळयुक्त गाय दुधाचा १० लाखाचा साठा नष्ट, नागज फाट्यावर कारवाई
By घनशाम नवाथे | Updated: May 5, 2025 21:04 IST2025-05-05T21:04:40+5:302025-05-05T21:04:54+5:30
Sangli News: अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी दुपारी नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे दूध वाहतुक करणाऱ्या टॅंकरची अचानक तपासणी मोहिम राबविली. यावेळी पाच टॅंकरमधील ७५ हजार लिटर दुधाची प्राथमिक तपासणी केली.

भेसळयुक्त गाय दुधाचा १० लाखाचा साठा नष्ट, नागज फाट्यावर कारवाई
- घनशाम नवाथे
सांगली - अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी दुपारी नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे दूध वाहतुक करणाऱ्या टॅंकरची अचानक तपासणी मोहिम राबविली. यावेळी पाच टॅंकरमधील ७५ हजार लिटर दुधाची प्राथमिक तपासणी केली. गाय दुधामध्ये भेसळीच्या संशयावरून १० लाख ६३ हजार ८६० रूपयांचा ३० हजार ३९६ लीटर गाय दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. रविवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
सहाय्यक आयुक्त (अन्न) निलेश मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी पवार व स्वामी, नमुना सहाय्यक कवळे व कसबेकर यांच्या पथकाने रविवारी दुपारी नागज फाटा येथे थांबून जाणाऱ्या पाच दुध वाहतुक करणाऱ्या टँकरची तपासणी केली. टॅंकरमधील दुधाची ‘इन्स्टंट स्ट्रीप’ च्या सहाय्याने भेसळीची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणाऱ्या टॅंकरमधील दुधाचे तीन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
टॅकर (एमएच ०९ जीआर ५५६७) मधील गाय दुधाची प्राथमिक तपासणी केली. त्यामध्ये मीठाची भेसळ आढळून आली. या टॅंकरमधून दोन कप्प्यातील गाय दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेतले. यावेळी गाय दुधाचा १० लाख ६३ हजार ८६० रूपये किंमतीचा ३० हजार ३९६ लिटर गाय दुधाचा उर्वरीत साठा भेसळीच्या संशयावरुन ओतून नष्ट केला. गाय दुधाचा टॅंकर घेरडी (ता. सांगोला) येथील एलकेपी दुध शितकरण केंद्रातून दुध घेवून कोल्हापूर जिल्ह्यातील एका कंपनीकडे जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. नमुने घेतलेल्या दुधाचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
भेसळीबाबत थेट तक्रार करा
नागरिकांना अन्न पदार्थामधील भेसळीबाबत काही माहिती असल्यास तसेच अन्न पदार्थांबाबत काही तक्रारी असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या सांगली कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करावा. तसेच ई मेल आयडी fdasangli@gmail.com यावर माहिती किंवा तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी केले आहे.