नेर्ले : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांत चित्र बदलले आहे. यामुळेच सत्ताधाऱ्यांवर ऐन निवडणुकीत दर काढण्याची वेळ आली आहे. हाच दर उसाला दिला असता तर शेतकऱ्याचा प्रपंच मार्गी लागला असता. आपल्या लढाईसाठी रयत पॅनलच्या पाठीशी ठाम राहा, असे आवाहन सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते रयत पॅनलच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख डॉ. इंद्रजित माेहिते यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कदम म्हणाले, पतंगराव कदम व कृष्णाचे भावनिक नाते आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अद्याप मलाही शेअर्स दिलेला नाही. अशा आठ हजारांवर मृत सभासदांच्या वारसांचा हक्क नाकारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.
इंद्रजित मोहिते, कृष्णाचा कारभार करत असताना तोडणी वाहतूकदारांच्या नावाने रकमा उचलून भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. राजकारणातील सरंजामी वृत्ती मोडून काढून आपल्याला रयतेचे राज्य आणायचे आहे. उथळ विचार बाजूला करून शेतकऱ्यांची एकजूट करून रयतेचे राज्य कृष्णेवर आणूया.
अनिल जगताप यांनी स्वागत केले. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, संजय पाटील, भारत मोहिते, डॉ. सुधीर जगताप, राजेंद्र चव्हाण, प्रा. अनिल पाटील, गीतांजली थोरात, शिवराज मोरे, डॉ. सविता मोहिते, डॉ. जितेश कदम, मनोहर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र फरणे यांनी आभार मानले. यावेळी रघुनाथ कदम, जयसिंग कदम, शंकर खवले, बाळासाहेब जगताप, उदय पाटील, पंकज पिसाळ, दिग्विजय सूर्यवंशी, प्रशांत पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
सहकारमंत्री विश्वजीत कदम यांच्या भाषणावेळी पावसाने सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाऊस पडत आहे, विजय पक्का आहे’, अशी घोषणा दिली. यावर मंत्री कदम म्हणाले, सातारा जिल्ह्यातल्या इतिहास विधानसभेच्या वेळेचा ताजा आहे. पाऊस हा त्याचा संकेत आहे.
फोटो :
ओळ : नेर्ले (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते रयत पॅनलच्या प्रचार सांगता सभेत सहकारमंत्री विश्वजीत कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी इंद्रजित मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते.