इस्लामपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील साखर कामगारांच्या प्रश्नावर त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने १६ डिसेंबरपासून सुरू होणारा साखर कामगारांचा बेमुदत संप स्थगित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी ही माहिती दिली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि. ११ डिसेंबरला शासन आदेशानुसार साखर कारखाना प्रतिनिधी, कामगार संघटना प्रतिनिधी, शासन प्रतिनिधी यांनी त्रिपक्षीय समिती गठित करून लवकरात लवकर साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असे निर्देश दिले आहेत. शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याने राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनीसुद्धा दोन्ही राज्य संघटनांना बेमुदत संप स्थगित करण्याचे आवाहन केले असल्याचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी सांगितले.
राज्यातील साखर कामगारांच्या प्रश्नावर त्रिसदस्यीय समिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:17 IST