शेडगेवाडीतील दुकाने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:11+5:302021-04-10T04:26:11+5:30
कोकरुड : गेले वर्षभर सर्व व्यवसाय बंद असतानाही बँका, पतसंस्था, बचत गट, फायनान्स कंपन्या आदी संस्थांकडून कर्जाची वसुली सुरू ...

शेडगेवाडीतील दुकाने सुरू करा
कोकरुड : गेले वर्षभर सर्व व्यवसाय बंद असतानाही बँका, पतसंस्था, बचत गट, फायनान्स कंपन्या आदी संस्थांकडून कर्जाची वसुली सुरू आहे. त्यातच विविध कर व वीज बिल वसुली यांचा तगादा सुरू आहे. अशावेळी पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आम्ही देणेकऱ्यांची देणी देणार कशी, असा सवाल करून, प्रशासनाचे नियम व अटी घालून दुकाने सुरू करावीत, अशी मागणी शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन दिले आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने सरकारने जमावबंदी व संचारबंदी सुरू केल्याने जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य दुकाने बंद आहेत. याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठ्या बाजारपेठा बंद आहेत. बाजारपेठा बंद असल्या तरी, बँंका, पतसंस्था, सोसायटी, फायनान्स, बचत गट, विविध संस्था यांच्याकडून कर्जाची वसुली सुरूच आहे. त्यातच आयकर विभाग, जीएसटी आणि वीज बिल यांचीही वसुली सुरू आहे. वर्षभर पूर्ण व्यवसाय बुडाल्याने, देणी कशी भागवायची असा प्रश्न व्यापारी वर्गाला पडला असतानाच, पुन्हा लॉकडाऊन झाल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. प्रशासनाचे सर्व नियम पाळू; पण आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच बाजीराव शेडगे, तंटामुक्त अध्यक्ष दिनकर शेडगे, संजय शिरसट, रमेश खोत, संजय कोठावळे, अजय पाटील, सखाराम जाधव, सुरेश वडकर आदी उपस्थित होते.