जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवरील शाळा ऑफलाईन सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST2021-07-03T04:18:24+5:302021-07-03T04:18:24+5:30
सांगली : जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे ते ऑनलाईन शिक्षणही ...

जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवरील शाळा ऑफलाईन सुरू करा
सांगली : जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे ते ऑनलाईन शिक्षणही घेऊ शकत नाहीत. यामुळे वाड्या-वस्त्यांवरील कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळा ऑफलाईन सुरू कराव्यात, असा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत शुक्रवारी घेण्यात आला.
सभापती आशाताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण समितीची सभा झाली. या सभेत सदस्यांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कमी पटसंख्येच्या शाळा ऑफलाईन सुुरू करण्याची मागणी केली. यावर आशा पाटील यांनी वाड्या-वस्त्यांवरील कमी पटाच्या शाळा ऑफलाईन सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली. राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत होणारी पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षा कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. त्यानुसार शाळास्तरावर प्रविष्ट विद्यार्थ्यांचा सराव सुरू ठेवून सक्षमपणे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देईल, असे प्रयत्न शिक्षकांनी करावेत.