मुरगूडमध्ये स्टँडचे काम पाडले बंद
By Admin | Updated: March 26, 2015 00:09 IST2015-03-25T23:52:08+5:302015-03-26T00:09:41+5:30
नागरिकांमधील संतापाचा उद्रेक : जुजबी खड्डे बुजविण्याचा प्रयत्न

मुरगूडमध्ये स्टँडचे काम पाडले बंद
मुरगूड : मुरगूड येथील एस. टी. स्टँडच्या उखडलेल्या परिसरातील काही मोजकेच खड्डे बुजवून जुजबीकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी रोखून धरत चांगलेच धारेवर धरले.
एस.टी. स्टँडची इमारत भव्य आहे; पण महामंडळाने याकडे दुर्लक्षित केल्याने ते समस्यांचेच आगार बनले आहे. या परिसराचे डांबरीकरण होऊन तब्बल १७ वर्षे झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात सर्वत्र दलदल, तर उन्हाळ्यात प्रचंड धूळ निर्माण होत असल्याने प्रवाशांसह आजूबाजूचे दुकानदारही वैतागले आहेत.
याबाबत स्थानिक नागरिकांनी, संघटनांनी अनेकवेळा आंदोलने केली. वरिष्ठांना निवेदने दिली; पण कोणीही इकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. कालपासून अचानक काही कामगार या ठिकाणी आले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. संपूर्ण परिसर डांबरीकरण होणार असा समज सर्वांचाच झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होऊ लागले; पण बुधवारी ठराविक ठिकाणचेच खड्डे बुजविण्याचा प्रयत्न या ठेकेदाराकडून झाल्याने संतप्त नागरिकांनी स्टँड परिसरात गर्दी केली.
आठ लाख रुपये मंजूर असताना दोन ट्रॉली खडी आणि डांबर इतकेच साहित्य या ठिकाणी आणले होते. उपस्थित नागरिकांनी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले. संपूर्ण परिसराचे डांबरीकरण करा, अन्यथा काम बंद करा, असा इशारा माजी नगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी दिला. आठ लाख रुपयांचे काम झाल्याबाबतचे योग्य प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय ठेकेदाराला इथून सोडणार नाही, असा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर फोनाफोनी करून ठेकेदाराने सर्व प्रकार कळविला. आज, गुरुवारी अधिकारी या परिसराला भेट देण्याची शक्यता असून, महामंडळ व पीडब्ल्यूडी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम पूर्ण करावे, अन्यथा परिसरामध्ये एसटी फिरकू दिली जाणार नाही, असा इशारा सानिका स्पोर्टस्चे अध्यक्ष सुशांत मांगोरे यांनी दिला.
यावेळी प्रतिबिंब पत्रकार विचारमंचचे वि. रा. भोसले, शाम पाटील, राजू चव्हाण, समीर कटके, संदीप सूर्यवंशी, प्रकाश तिराळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी )