जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच
By Admin | Updated: July 3, 2016 00:33 IST2016-07-03T00:33:13+5:302016-07-03T00:33:13+5:30
अनेक भागात मुसळधार

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच
सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला असून, शनिवारी दिवसभर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच होता. जिल्ह्याच्या पूर्वभागात अजूनही समाधानकारक पाऊस नसला तरी पश्चिम भागात विशेषत: शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांत संततधार सुरू होती.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने धरण साठ्यात वाढ होत असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत ५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर सर्वाधिक २७.२ मिलिमीटर पावसाची नोंद शिराळा तालुक्यात झाली आहे. शनिवारी दिवसभर शहरासह जिल्ह्णात संततधार सुरूच होती. शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यात दमदार पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण परिसरात शुक्रवारी १० मिलिमीटर पाऊस झाला.
जिल्ह्णात बहुतांश तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असतानाच, आटपाडी तालुक्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. शनिवारी सकाळपर्यंत सरासरी ५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून,
तालुकानिहाय आकडेवारी मिरज ५.७, जत २.३, वाळवा ९.६, शिराळा २७.२, पलूस ५.५, कवठेमहांकाळ ०.२, विटा ०.६, तासगाव ३.५ अशी पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)