समाधान मेळाव्याला अधिकाऱ्यांची दांडी
By Admin | Updated: January 1, 2015 00:06 IST2014-12-31T22:55:02+5:302015-01-01T00:06:08+5:30
अनिल बाबर यांच्याकडून नाराजी : दांडी मारत असतील, तर कसले घेता मेळावे?

समाधान मेळाव्याला अधिकाऱ्यांची दांडी
विटा : प्रशासकीय अधिकारी येतात म्हणून लोक समाधान मेळाव्यात कामे घेऊन येतात. लोकांची कामे जाग्यावर झाली तरच समाधान मेळावा यशस्वी होतो. परंतु, अधिकारीच अशा मेळाव्यांना दांडी मारत असतील तर, कसले घेता मेळावे. प्रशासनाने मेळाव्यांची माहिती संबंधित विभागाला दिली पाहिजे, पण प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहात नाही, असे दिसते. त्यामुळे आजच्या समाधान मेळाव्याकडे पाठ फिरवून दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा काढा, अशा सूचना देत आ. अनिल बाबर यांनी आज नागेवाडी येथील समाधान मेळाव्यात अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
नागेवाडी (ता. खानापूर) येथे राज्य शासनाच्या सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत आज, बुधवारी समाधान मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी. जे. चोथे, सरपंच सुनंदा निकम उपस्थित होते. यावेळी आ. बाबर यांनी या समाधान मेळाव्याच्या व्यासपीठावर अचानक एंट्री मारताच प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी टेंभूचे पाणी भाग्यनगर तलावात सोडण्याबरोबरच पाणंद रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी केली. परंतु, पाटबंधारे विभागाचे अधिकारीच मेळाव्याला नसल्याने आ. बाबर यांनी प्रशासनाला फैलावर घेतले.
ते म्हणाले, शासनाच्या लोकशाही दिन, समाधान मेळाव्याकडे जनता का पाठ फिरवित आहे, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तालुक्यात आयोजित होणाऱ्या मेळाव्याची माहिती संबंधित विभागांना दिली पाहिजे, त्यासाठी प्रशासन गंभीर नसल्याचे आजच्या मेळाव्यावरून दिसून येते. असेही आ. बाबर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. (वार्ताहर)
कारणे दाखवा नोटीस काढा
लोकांचे काम झाल्यानंतर त्यातून जनतेला समाधान मिळाल्यानंतरच खऱ्याअर्थाने हा समाधान मेळावा यशस्वी होईल. पण आज अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मेळाव्याला दांडी मारली आहे. त्यामुळे गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढा, असेही बाबर म्हणाले.