श्रीनगरला अडकलेले गलाई बांधव परतले--अजूनही ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये...

By Admin | Updated: September 16, 2014 23:51 IST2014-09-16T23:00:10+5:302014-09-16T23:51:09+5:30

आसू आणि हसू : ८० जणांच्या कुटुंबियांत समाधान

Srinagar: The 30-year-old gang has returned to Srinagar | श्रीनगरला अडकलेले गलाई बांधव परतले--अजूनही ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये...

श्रीनगरला अडकलेले गलाई बांधव परतले--अजूनही ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये...

विटा : नभातून कोसळणारा मुसळधार पाऊस... पुराच्या पाण्याची वाढलेली पातळी... घराच्या छताचा आधार... सभोवताली काळाकुट्ट अंधार... समोर दिसत असलेला मृत्यू... आणि नातेवाईकांचा तुटलेला धीर... असा थरार अनुभवत आणि मिळेल ते खाऊन आठ-दहा दिवस मृत्यूचा सामना करीत खानापूर, तासगाव, आटपाडी, खटाव आणि माण तालुक्यातील श्रीनगरच्या पुरात अडकलेले शेकडो मराठी गलाई बांधव आज, मंगळवारी सकाळी विटा येथे आपल्या मायभूमीत दाखल झाले. यावेळी या गलाई बांधवांसह त्यांच्या नातेवाईकांच्याही डोळ्यात आसू आणि चेहऱ्यावर हसू उमटले.
खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव तालुक्यातील हजारो मराठी गलाई बांधव सोने-चांदी व्यवसायानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झाले आहेत. तेथे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झेलम नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात हे शेकडो गलाई बांधव अडकून पडले होते. गावाकडील नातेवाईकांचाही संपर्क तुटला होता. त्यामुळे नातेवाईक हवालदिल झाले होते. सांगलीचे निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, विट्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी विटा व सांगली येथे संपर्क कक्ष सुरू करून, श्रीनगर येथे पुरात अडकलेल्या मराठी गलाई बांधवांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते.
त्या पार्श्वभूमीवर श्रीनगर प्रशासनाशी संपर्क साधून लाल चौक, महाराजा बझार, कुकर बझार, जैनाकधर आदी भागात पुराच्या पाण्यात अडकलेल्या गलाई बांधवांची यशस्वीरित्या सुटका केली. यावेळी कुर्ली येथील दिल्लीतील गलाई बांधव शहाजीराव पाटील, नेलकरंजीचे गुणवंत भोसले (चंडीगढ), ठाणे येथील हेमंत धनवडे आदींनी प्रयत्न करून पुरात अडकलेल्या गलाई बांधवांना सुखरूप बाहेर काढून त्यांना श्रीनगरहून विशेष विमानाने मुंबई येथे पाठविले.
त्यानंतर ठाणे येथील हेमंत धनवडे यांनी स्वखर्चाने सुमारे ८० गलाई बांधव व त्यांच्या कुटुंबियांना खासगी बसने विट्याकडे पाठविले. आज सकाळी विटा येथे बस आल्यानंतर त्यांना पाहताच घोटीखुर्द, रेवणगाव, विसापूर, विटा, सुळेवाडी, ढवळेश्वर, कळंबी, आटपाडी, नेलकरंजी, पळशी, हिवरे या गावांतील नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. नातेवाईक व गलाई बांधवांच्या डोळ्यात आसू व चेहऱ्यावर हसू दिसून आले.
यावेळी विटा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता जाधव, हणमंत पाटील, आनंदराव पाटील, रत्नमाला पाटील, संगीता भोसले, वनिता जाधव, प्रवीण मोरे आदींनी गलाई बांधवांचे स्वागत केले. सांगली जिल्हा प्रशासनासह पुराच्या संकटात मदत करणाऱ्या विविध संघटना व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना गलाई बांधवांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. (वार्ताहर)

सलग दोन ते तीन दिवस पाऊस पडल्याने झेलम नदीला पूर आला होता. नदीपासून अवघ्या ५० ते ७० मीटर अंतरावर लाल चौक आहे. चौथ्या दिवशी अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे क्षणातच पाण्याचा लोट बाजारपेठेत घुसला. दुकानांची शटर बंद करण्यापूर्वीच पुराचे पाणी पहिल्या मजल्यापर्यंत आले. आम्ही तातडीने जिवाची पर्वा न करता कुटुंबियांसह तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो. चार ते पाच दिवस आमच्या इमारतीचा दीड मजला पाण्याखाली होता. पाण्यात साहित्याचे मोठे नुकसान झाले. जवानांनी आम्हाला अन्नाची पाकिटे, पाणी, बे्रड पुरविले. ते खाऊन आम्ही सहा दिवस काढले. या सहा दिवसात अंगावर शहारे आणणारा महाप्रलय पाहिला.
- धनाजी हसबे, गलाई व्यावसायिक, महाराजा बझार, श्रीनगर

अजूनही ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये...
खानापूर, कडेगाव, आटपाडी, माण, खटाव, सांगोला तालुक्यातील एकूण ४० कुटुंबे श्रीनगरच्या लाल चौक, जैनाकधर परिसरात आहेत. नदीचा पूर ओसरल्यानंतर १० कुटुंबे आज, मंगळवारी विटा शहरात दाखल झाली आहेत. उर्वरित गलाई बांधवांची अजून ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये आहेत. पुराचे पाणी कमी झाल्याने तेथील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असल्याचे विट्यात दाखल झालेल्या गलाई बांधवांनी सांगितले.

Web Title: Srinagar: The 30-year-old gang has returned to Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.