शाळांना क्रीडा प्रोत्साहनात्मक अनुदान
By Admin | Updated: July 23, 2015 00:13 IST2015-07-22T23:33:50+5:302015-07-23T00:13:11+5:30
‘शांतिनिकेतन’ची बाजी : नऊ लाखांचे अनुदान

शाळांना क्रीडा प्रोत्साहनात्मक अनुदान
सांगली : क्रीडा संचालनालयातर्फे शाळांना दिले जाणारे क्रीडा प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर झाले आहे. सांगलीतील पाच शाळांचा यामध्ये समावेश आहे. शांतिनिकेतन विद्यामंदिर ही शाळा यामध्ये आघाडीवर आहे. एकूण नऊ लाखांचे अनुदान जिल्ह्याच्या क्रीडा खात्यात जमा होईल. येथील सांगली हायस्कूलमध्ये महापालिका शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांची नावे क्रीडाधिकारी कार्यालयाने जाहीर केली. शासन परिपत्रकानुसार जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या शाळांना अनुक्रमे दहा, सात व पाच असे गुण दिले जातात. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांतून एक ते तीन क्रमांक काढले जातात. विजेत्या शाळांना पुढीलप्रमाणे क्रीडा प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते : प्रथम : एक लाख, द्वितीय : पंच्याहत्तर हजार, तृतीय : पन्नास हजार.
अनुदान जाहीर झालेल्या शाळा : २०१३-१४ : चौदा वर्षे गट : आप्पासाहेब बिरनाळे स्कूल (प्रथम), शांतिनिकेतन विद्यामंदिर (द्वितीय), नवकृष्णा व्हॅली स्कूल (तृतीय). सतरा वर्षे गट : शांतिनिकेतन विद्यामंदिर (प्रथम), नवकृष्णा व्हॅली स्कूल (द्वितीय), आप्पासाहेब बिरनाळे स्कूल (तृतीय).
२०१४-१५ : चौदा वर्षे गट : शांतिनिकेतन विद्यामंदिर (प्रथम), आप्पासाहेब बिरनाळे स्कूल (द्वितीय), किर्लोस्कर हायस्कूल (तृतीय). सतरा वर्षे गट : शांतिनिकेतन विद्यामंदिर (प्रथम), आप्पासाहेब बिरनाळे स्कूल (द्वितीय), विद्यामंदिर प्रशाला (तृतीय). शासनाकडून अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान वितरित करण्यात येईल, अशी माहिती क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी दिली.
तर शाळांवर कारवाई...
प्रत्येक शाळेला शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेतील किमान दोन सांघिक व तीन वैयक्तिक खेळ प्रकारांत सहभागी होणे शासन परिपत्रकानुसार बंधनकारक आहे. ज्या शाळा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांच्यावर यंदाच्या वर्षी कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी दिला.