डफळापूरच्या पाण्यावरून संघर्षाची ठिणगी
By Admin | Updated: January 3, 2015 00:14 IST2015-01-02T23:27:44+5:302015-01-03T00:14:23+5:30
बसाप्पाचीवाडीचा विरोध : पेयजल योजनेचे काम आजपासून बंदोबस्तात

डफळापूरच्या पाण्यावरून संघर्षाची ठिणगी
डफळापूर : पाणी... पाणी... म्हणून वर्षानुवर्षे टाहो फोडणाऱ्या डफळापूरकरांचा कायमस्वरुपी पाणीप्रश्न सुटावा म्हणून राष्ट्रीय पेयजल योजना शासनाने मंजूर केली आहे. परंतु, या योजनेला बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे पाण्यावरून दोन्ही गावातील संघर्ष पेटला आहे. डफळापूर पाणी योजनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी पोलीस बंदोबस्तात बसाप्पाचीवाडी येथील काम पूर्ण करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्यासाठी शनिवार दि. ३ जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्ताची त्यांनी मागणी केली आहे.
डफळापूरसाठी २०११ मध्ये पाणी योजना शासनाने मंजूर केली. बसाप्पाचीवाडी तलावातून नळपाणी पुरवठा योजनेसाठी साडेसात कोटी रुपयांची योजना मंजूर केला होता. ठेकेदाराने आतापर्यंत अडीच कोटी रुपयांची कामे केली आहेत. परंतु, निधी देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली. त्याचबरोबर ही नळपाणी पुरवठा योजना होऊ नये म्हणून बसाप्पाचीवाडी येथील काही ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. त्यांच्याकडून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला. विरोध दूर करण्यासाठी डफळापूर येथील पदाधिकाऱ्यांनी बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थांबरोबर बैठका घेतल्या, परंतु यातून काही तोडगा निघाला नाही. बसाप्पाचीवाडी तलावात उपसा व जॅकवेलसाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली. तरीसुध्दा येथील ग्रामस्थांचा विरोध कायम राहिला. डफळापूर येथील पदाधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन बसाप्पाचीवाडी येथील विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचा बंदोबस्त करण्याविषयी बैठक घेतली. तरीही यातून आर. आर. पाटील यांनी ठोस भूमिका न घेतल्यामुळे काहीच तोडगा निघाला नाही.
मागील आठवड्यात डफळापूर ग्रामपंचायत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल समिती व ग्रामस्थांनी कवठेमहांकाळ तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन दिले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत या योजनेचे काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन कवठेमहांकाळ पोलिसांनी डफळापूरकरांना दिले. त्यानुसार डफळापूरकरांनी पोलीस बंदोबस्त मागविला. बंदोबस्तासाठी पैसे भरले. या योजनेला गती येणार व डफळापूर गावाचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे. ३ जानेवारी रोजी मोठ्या संख्येने ग्रामस्थ बसाप्पाचीवाडी येथे तलावात कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)
डफळापूर येथील पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रशासनाने डफळापूर येथील पाणी योजना अध्यक्ष चव्हाण यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत बंदोबस्तासाठी पैसे भरले. परंतु, त्यावेळी पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. तेथील ग्रामस्थांचा विरोध कायम राहिला. या प्रकारामुळे डफळापूर ग्रामस्थांतून संतप्त प्रक्रिया उमटत आहेत. बसाप्पाचीवाडी पाणी योजनेसाठी डफळापूरकरांनी आक्रमक पवित्रा घेतला.