आटपाडीतील 'बोधी' स्टुडिओत मराठी चित्रपटातील गीते संगीतबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:24+5:302021-06-29T04:18:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : आटपाडीत अनेक नव्या रत्नांची खाण असून, त्या रत्नांनी प्रत्येक क्षेत्रात आपला अटकेपार झेंडा रोवला ...

आटपाडीतील 'बोधी' स्टुडिओत मराठी चित्रपटातील गीते संगीतबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : आटपाडीत अनेक नव्या रत्नांची खाण असून, त्या रत्नांनी प्रत्येक क्षेत्रात आपला अटकेपार झेंडा रोवला आहे. ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर यांनी सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला होता. आता विशेषत संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकारांनी 'बोधी' स्टुडिओ निर्माण केला आहे. याच स्टुडिओमध्ये दलितमित्र ज्ञानदेव कदम यांच्या आत्मचरित्रावर आधारित 'ज्ञानयोगी' चित्रपटाची गीते संगीतबद्ध करण्यात आली आहेत.
आटपाडीतील प्रसिद्ध सोक्सोफोन वादक सुनील ऐवळे व त्यांच्या कुटुंबीयांनी बँड वाजविण्याच्या परंपरागत व्यवसाय जोपासत आधुनिकतेची जोड देत आपल्या संगीत क्षेत्रात ग्रामीण भागात राहून रेकाॅर्डिंग स्टुडिओ निर्माण केला. याच कुटुंबातीलच पेशाने शिक्षक असलेल्या सुनील ऐवळे यांनी बोधी स्टुडिओच्या माध्यमातून आटपाडीसारख्या ग्रामीण भागात मराठी चित्रपटातील गीते संगीतबद्ध करण्यात यश मिळविले आहे.
दलितमित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढाचे प्राचार्य डॉ. सुभाष कदम यांची निर्मिती असलेल्या 'ज्ञानयोगी' चित्रपटची कथा, पटकथा संवाद लेखन व दिग्दर्शन प्रा. बालाजी वाघमोडे यांचे आहे, तर ग्रामीण कवी म्हणून परिचित असणारे कवी ज्ञानेश डोंगरे यांची गीते आहेत. चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचे रेकॉर्डिंग बोधी स्टुडिओमध्ये यशस्वीपणे पार पडले असून, समाधान ऐवळे यांनी संगीतबद्ध केले आहे.
चित्रपट निर्मिती करण्याची योजना ते दलितमित्र ज्ञानदेव कदम यांच्या जीवनपटाची माहिती प्रा. बालाजी वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रसिक सपाटे, किरण सोहनी, दीपक खरात, अमोल वाघमारे, दादा सावंत, ओकार इंगवले, श्याम ऐवळे, रविकिरण जावीर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.