सोनसळकरांचा हातच ‘लय भारी’

By Admin | Updated: August 17, 2015 00:13 IST2015-08-16T22:14:07+5:302015-08-17T00:13:22+5:30

कवठेमहांकाळात राजकारण तापले: राष्ट्रवादीचे संस्थान खालसाची वेळ-कवठेमहांकाळचे कुरुक्षेत्र -३

Sonalakar's hand 'rhythm heavy' | सोनसळकरांचा हातच ‘लय भारी’

सोनसळकरांचा हातच ‘लय भारी’

अर्जुन कर्पे-  कवठेमहांकाळ  सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत ‘महांकालीच्या कुरुक्षेत्रावर’ वाळव्याच्या वाघाच्या डरकाळीपेक्षा सोनसळच्या साहेबांचा ‘हातच लय भारी’ ठरला असून, त्या दुष्काळी पट्ट्यात राष्ट्रवादीचे संस्थान काबीज करण्यासाठी सोनसळच्या साहेबांनी जोरदार खालसा धोरण राबवण्याचा धडाका सुरू केला. मात्र खालसा धोरणामुळे याचा फटका राष्ट्रवादी व कॉँगेसच्या गटालाही बसला. असे असले तरी या निवडणुकीच्या माध्यमातून सोनसळच्या डॉ. पतंगराव कदम साहेबांचा जिल्ह्यातील साम्राज्य विस्तार वाढू लागला आहे, हे स्पष्ट झाले आहे. तर वाळव्याच्या वाघाचा कायमच वेगात असणारा अश्वरथ मात्र ऐन लढाईवेळी दुष्काळी कुरुक्षेत्रावर गटवारी, नाराजी अन् जिरवाजिरवीच्या राजकीय गाळात रुतला.
बाजार समितीच्या निवडणुकीत भविष्यातील राजकारणाची अनेक बीजे पेरली गेली आणि ही बीजे पुढील राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार आहेत, हे निश्चित.
या निवडणुकीच्या माध्यमातून कवठेमहांकाळ, जत, मिरज या दुष्काळी टापूत साम्राज्य विस्ताराचे धोरण राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय नेते जयंत पाटील, तर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी राबवले. यामध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्या राजकीय समीकरणाला यश आल्याने साहजीकच या दुष्काळी टापूत सोनसळच्या साहेबांचा राजकीय वारू सुसाट धावू लागला आहे.
‘आबा’ हे माझे लहान बंधू आहेत, असे सांगत सोनसळच्या साहेबांनी थेट दुष्काळी टापूत ‘हात’ घतला. त्यामुळे या निवडणुकीत आबांनी सांभाळलेले काही मोहरे सोनसळच्या साहेबांच्या ‘हाताला’ लागले आहेत. यातील काही मोहऱ्यांनी या निवडणुकीत ‘राजकीय हात धुऊन’ही घेतले, तर काही नाराज मोहरेही साहेबांच्या या निवडणुकीच्या माध्यमातून संपर्कात आहेत. मुळात सोनसळच्या साहेबांनी एका निशाणात अनेक राजकीय उद्दिष्ट्ये साध्य केली आहेत. त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादीला तर हादरा दिलाच, परंतु खोलवर राजकीय विचार करता गटा-तटाच्या राजकारणातही ते सर्वांनाच भारी पडले आहेत. कॉँग्रेसमध्येसुद्धा गटा-तटाच्या राजकारणाचा विचार करता, तालुक्यात सोनसळकरांचा राजकीय दबदबा वाढण्यास सुरुवात झाली आहे.


वसंतदादा गट बॅकफुटवर!
या निवडणुकीत प्रतीक पाटील व विशाल पाटील तालुक्यात कुठेच लोकांच्या चर्चेत दिसले नाहीत. त्यामुळे भविष्यातील जिल्ह्याच्या गटा-तटाच्या राजकारणात कवठेमहांकाळ तालुक्यात ‘दादा गटाला’ बॅकफुटवर यावे लागणार, हे स्पष्ट झाले आहे. कवठेमहांकाळ, जत, मिरज या तालुक्यात जयंतराव पाटील यांना मात्र ही निवडणूक ‘दगा’ देणारी ठरली आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजपर्यंत सात अश्वांचा धावणारा जयंत पाटील यांचा राजकीय रथ या निवडणुकीत पतंगरावांनी रोखला. एकूणच या निवडणुकीत वाळव्याच्या वाघाच्या डरकाळीला ‘सोनसळच्या साहेबांचा हातच’ लय भारी ठरला आहे.

Web Title: Sonalakar's hand 'rhythm heavy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.