बळ कुणाला, पै-पाहुण्यांना की पक्षनिष्ठेला?
By Admin | Updated: July 8, 2014 00:41 IST2014-07-08T00:41:24+5:302014-07-08T00:41:56+5:30
जयंतरावांपुढे आव्हान : शिराळा मतदारसंघाबाबत नवा तिढा

बळ कुणाला, पै-पाहुण्यांना की पक्षनिष्ठेला?
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
एकीकडे पै-पाहुण्यांचा गोतावळा, तर दुसरीकडे आमदार मानसिंगराव नाईक यांची पक्षनिष्ठा... त्यामुळे बळ कोणाला द्यायचे, अशा कैचीत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील अडकले आहेत. त्यामुळे शिराळा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळण्यासाठी मानसिंगराव नाईक यांनी आधीच देव पाण्यात घातले आहेत, तर जयंतरावांचे साडू सत्यजित देशमुख यांनी शिराळ्यावर काँग्रेसचा हक्क सांगून स्वत:ची उमेदवारी निश्चित मानत तयारी सुरू केली आहे.
शिराळ्यातील राजकीय आणि सहकारी संस्थांची ताकद नाईक घराण्यात विखुरलेली आहे. मात्र नाईक घराण्यात दोन गट आहेत. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार मानसिंगराव नाईक करत आहेत, तर त्यांच्याविरोधात माजी मंत्री शिवाजीराव नाईक महायुतीच्यावतीने तयारीला लागले आहेत. या दोन गटांसोबत तेथे देशमुख गटाचीही ताकद आहे.
विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या काँग्रेसमधील ताकदीवर त्यांचे चिरंजीव सत्यजित यांनी आगामी विधानसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. सत्यजित हे जयंत पाटील यांचे साडू आहेत. शिवाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिल्याचा दावा ते करत आहेत. याउलट आमदार नाईक यांनी सहकारी आणि खासगी उद्योगाच्या बळावर मोर्चेबांधणी केली आहे. मागील निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली व नंतर ते राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार झाले. आताची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी जयंत पाटील यांच्यासह अजित पवार यांना साकडे घातले आहे.
शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश असून, तेथे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या समर्थकांची ताकद आहे. या ताकदीवरच शिराळ्यातील आमदार ठरवला जातो, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जातो, तर याच गावांतील राष्ट्रवादीच्या विरोधातील नेते नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील यांचे कार्यकर्ते मात्र, आमच्या ओंजळीने पाणी पिणारा उमेदवार आमदार होतो, असा दावा करतात.
राज्यपातळीवर दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शिराळा मतदारसंघात सत्यजित देशमुख किंवा मानसिंगराव नाईक यांच्यापैकी एकाला थांबवावे लागणार आहे. दोघांची मनधरणी करताना जयंत पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.