लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मराठा समाजाचे आरक्षणाशिवाय प्रलंबित असणारे व राज्य सरकारच्या अखत्यारित येणारे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली.
मुंबई येथे त्यांनी चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी समांतर आरक्षणामध्ये कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्यास कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील महिलांना न्याय मिळून त्यांना शासकीय सेवेत समावून घेता येऊ शकते. भविष्यात त्यांना शासकीय सेवा आणि शिक्षणात योग्य प्रतिनिधित्व मिळू शकते, आदी मुद्दे मांडून ते देण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती पाटील यांनी केली.
२०१४-२०१५ मधील नियुक्त्या प्रलंबित असलेल्या मुलांनासुद्धा न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्त्या द्याव्यात, सामान्य प्रशासन विभागाच्या २ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवडपात्र उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच उर्वरित उमेदवारांबाबतही योग्य तो निर्णय घेण्यात यावा, न्यायालयाच्या निर्देशानुसार जी मुले खुल्या प्रवर्गातून पात्र आहेत, त्यांना या प्रवर्गातून नियुक्त्या देण्यास कोणतीही अडचण नाही, आदी मुद्दे मांडण्यात आले, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.