कृष्णा नदीत सापडले सॉफ्ट शेल जातीचे कासव, गळ्यात अडकलेला गळ शस्त्रक्रियेद्वारे काढून दिले नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 13:25 IST2021-11-30T13:24:41+5:302021-11-30T13:25:10+5:30
प्राणीमित्रांच्या प्रयत्नांमुळे कासवाला नवजीवन मिळाले. सॉफ्ट शेल जातीचे हे कासव होते.

कृष्णा नदीत सापडले सॉफ्ट शेल जातीचे कासव, गळ्यात अडकलेला गळ शस्त्रक्रियेद्वारे काढून दिले नवजीवन
सांगली : कासवाच्या गळ्यात अडकलेला गळ शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला. यशस्वी उपचारानंतर त्याला पुन्हा कृष्णा नदीत मुक्त करण्यात आले. प्राणीमित्रांच्या प्रयत्नांमुळे कासवाला नवजीवन मिळाले. सॉफ्ट शेल जातीचे हे कासव होते.
मच्छिमार मासेमारी करताना गळाला अमिष म्हणून गांडूळ लावतात. गांडूळ कासवाचेही आवडते खाद्य आहे. वसगडे (ता. पलूस) येथे मच्छीमारांनी पाण्यात सोडलेले गांडूळ खाण्याच्या धडपडीत धातूचा गळ कासवाच्या गळ्यात अडकला. सॉफ्ट शेल जातीचे कासव मच्छिमारांनी पकडले. याची माहिती प्राणीमित्र दीपक परीट यांना दिली.
कासवाला पुढील उपचारांसाठी सांगलीतील प्राणीमित्र कौस्तुभ पोळ यांच्याकडे आणले. पोळ यांनी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांच्या मदतीने पोळ कासवाला कोल्हापुरात वन विभागाचे डॉ. वाळवेकर यांच्याकडे नेले. तेथे क्ष किरण तपासणी केली असता मानेत अडकलेला धातूचा गळ दिसून आला. त्याला भूल देऊन शस्त्रक्रिया केली. गळ बाहेर काढून उपचार केले. त्यानंतर सांगलीत कृष्णेत मुक्त केले.
याकामी कडेगावच्या वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनीही मदत केली. महिन्याभरापूर्वीदेखील हरिपुरात गळात अडकलेल्या कासवाची मुक्तता करण्यात आली होती. मासेमारी दरम्यान जलचर फसल्यास त्याची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन अजितकुमार पाटील यांनी केले.