सांगलीत कोरोना उपचारांसाठी आतापर्यंत तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 15:32 IST2021-05-21T15:31:06+5:302021-05-21T15:32:30+5:30

संतोष भिसे सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारांसाठी रुग्णांना आजवर तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च सोसावा लागला आहे. ही ...

So far, Rs 29 crore has been spent for the treatment of corona in Sangli | सांगलीत कोरोना उपचारांसाठी आतापर्यंत तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च

सांगलीत कोरोना उपचारांसाठी आतापर्यंत तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च

ठळक मुद्देसांगलीत कोरोना उपचारांसाठी आतापर्यंत तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च२३ लाख परत करण्याचे आदेश

संतोष भिसे

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारांसाठी रुग्णांना आजवर तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च सोसावा लागला आहे. ही लाट जिल्ह्यासाठी अत्यंत महागडी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंबातील सदस्याला गमावण्याचे दु:ख तर प्रचंड आहेच, शिवाय उपचारांच्या खर्चामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर येत आहेत.

शासकीय रुग्णालयात विनाशुल्क बेड उपलब्ध नाहीत, आणि खासगी रुग्णालयांचा दोन-तीन लाखांचा खर्च परवडण्यापलीकडे आहे. त्यामुळे अनेक रुग्ण रुग्णालयांत न जाता घरातच उपचार घेत आहेत, त्यातून कोरोनाचे बळीही ठरत आहेत. खासगी कोविड रुग्णालयांनी १ एप्रिलपासूनच्या दुसऱ्या लाटेत ६ हजार ११८ रुग्णांवर उपचार केले, त्यासाठी २९ कोटी ९ लाख २९ हजार रुपये ७९५ रुपये खर्च घेतला. त्यामुळे कोरोनाचे उपचार गरिबांच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. महात्मा फुले योजनेतून उपचार मोफत असले तरी त्यातून पुरेसे बेड उपलब्ध होत नाहीत परिणामी गरिबांना आयुष्यभराची पुंजी कोरोनासाठी खर्ची टाकावी लागत आहे.

ऑडिटमुळे राहतेय नियंत्रण

सर्व खासगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे ऑडिट जिल्हा प्रशासन करते. जिल्हा कोषागार कार्यालयाने त्यावर काटेकोर नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे मनमानी बिल आकारणीला शह बसला आहे. अतिदक्षता विभाग, ऑक्सिजनचा वापर, रेमडेसिविर इंजेक्शन्स आदी प्रत्येक उपचारासाठी शासनाने दर निश्चित करुन दिले आहेत. त्यापेक्षा जास्त बिलांची आकारणी होऊ नये यावर कोषागार कार्यालयाचे बारीक लक्ष आहे. त्यामुळेच बिले अद्याप नियंत्रणात आहेत.

२३ लाख परत करण्याचे आदेश

कोषागार कार्यालयाच्या तपासणीमध्ये २०६ बिलांमध्ये जादा खर्च आकारल्याचे दिसून आले. ११० रुग्णांकडून २३ लाख २० हजार ५६२ रुपये जादा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाच रुग्णालयांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यानंतर रुग्णालयांनी १२ लाख १४ हजार ५८५ रुपये परत केले आहेत. अद्याप १० लाख ६३ हजार ११७ रुपये रुग्णांना परत मिळायचे आहेत.

१ एप्रिलपासूनच्या दुसऱ्या लाटेचा खर्च असा

  • खासगी कोविड रुग्णालये - ६७
  • उपचार घेतलेले एकूण रुग्ण - ६,११८
  • रुग्णांनी भरलेली बिले - २९ कोटी ९ लाख २९ हजार ७९५ रुपये
  •  ८ दिवसांपेक्षा जास्त काळ ॲडमिट रुग्ण - ४१४
  • प्रत्येक रुग्णाचा सरासरी खर्च - ४७ हजार ५५३
  •  मिरजेतील एका खासगी रुग्णालयातील सर्वाधिक रुग्ण - ४८०
  • या रुग्णालयाचे बिलिंग सर्वाधिक - ४ कोटी ३८ लाख १७ हजार ६१३
  • जादा आकारणी झालेली बिले - २०६
  • परत करावयाची रक्कम २३ लाख २० हजार ५६२ रुपये

Web Title: So far, Rs 29 crore has been spent for the treatment of corona in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.