विटा : येरळा नदीपात्रातील वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील महिला मंडल अधिकारी संगीता पाटील यांच्या अंगावर टेम्पो घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. भाळवणी (ता. खानापूर) येथे शनिवारी (दि.१८) मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत वाळू तस्करांनी दुचाकीवर टेम्पो घातल्याने मंडल अधिकारी संगीता पाटील यांच्या दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.याप्रकरणी प्रभज बाळासाहेब शिंदे व किरण नामदेव सावंत (दोघेही रा. भाळवणी, ता. खानापूर) या दोन वाळू तस्करांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाळवणी येथील येरळा नदीपात्रात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंडल अधिकारी संगीता पाटील यांच्यासह चौघांचे पथक नदीपात्रात गेले. यावेळी पथक आल्याचे लक्षात येताच वाळू तस्कर चालक प्रभज शिंदे व किरण सावंत या दोघांनी अवैध वाळू वाहतुकीसाठी आणलेला टेम्पो पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.यावेळी पाटील या प्रसंगावधान राखत दुचाकी (एमएच १०, बीपी ७७५७) तेथेच टाकून तत्काळ बाजूला झाल्याने त्यांच्यासह पथकातील अन्य तीन कर्मचारी सुदैवाने बचावले. मात्र, पाटील यांची दुचाकी टेम्पोच्या खाली सापडल्याने दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
सांगली: येरळा नदीपात्रात वाळूची तस्करी, कारवाईसाठी आलेल्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 17:25 IST