बेदाणा सौद्यात महिन्याला सोळा टनांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:02+5:302021-09-18T04:29:02+5:30
फोटो : १७०९२०२१एसएएन०२ : सौद्यात उधळलेला बेदाणा खाली टाकला जातो. फोटो : १७०९२०२१एसएएन०३ : सौद्यात उधळलेला बेदाणा नंतर गोळा ...

बेदाणा सौद्यात महिन्याला सोळा टनांची उधळण
फोटो : १७०९२०२१एसएएन०२ : सौद्यात उधळलेला बेदाणा खाली टाकला जातो.
फोटो : १७०९२०२१एसएएन०३ : सौद्यात उधळलेला बेदाणा नंतर गोळा करून पेट्यांमधून अडत्यांकडे जातो.
लोगो : बाजार समिती
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव, सांगली, पंढरपूर, विजापूर या चार प्रमुख बाजार समित्यांतून सौद्यांमध्ये महिन्याला सुमारे पंधरा ते सोळा टन बेदाण्यांची उधळण होते. याच उधळलेल्या बेदाण्याला पॉलिश करून उत्पादकांना वर्षाला वीस कोटींचा चुना लावला जातो. सातशे ग्रॅमचीच तूट गृहीत धरण्याचा नियम धुडकावून लावला जात आहे.
चार प्रमुख बाजार समित्यांतून बेदाण्याचे सौदे होतात. सर्व ठिकाणी मिळून दोन ते अडीच हजार कोटींची वार्षिक उलाढाल होते. तयार केलेल्या बेदाण्यातील पंधरा किलोंची एक पेटी सौद्यासाठी बाजार समितीत अडत्यांकडे आणली जाते. सौद्यावेळी अडत दुकानदारांकडून व्यापाऱ्यांना दाखविण्यासाठी पेटी फोडून बेदाण्याची उधळण केली जाते. मालाची विक्री झाली किंवा नाही, तरी त्या पेटीतून तीन ते पाच किलोपर्यंत बेदाणा कमी होतो. एका नमुन्यातून एकावेळी ही होणारी तूट किरकोळ दिसत असली, तरी या तुटीतून बेदाणा उत्पादकांची वर्षाला वीस कोटी रुपयांची लूट होत आहे.
तासगाव बाजार समितीत एकावेळी ४० अडत्यांचे ६० ते ७० सौदे एका दिवशी होतात. एका सौद्यासाठी दीड ते दोन हजार पेट्या येतात. सौद्यात कितीही उधळण झाली, तरी सातशे ग्रॅमचीच तूट गृहीत धरण्याचा नियम बाजार समितीने तयार केला आहे. मात्र हा नियम कागदावरच राहिला आहे.
बाजार समितीत केलेल्या पाहणीत सरासरी प्रत्येक पेटीतून तीन किलोपर्यंत तूट येते. उधळण झालेल्या बेदाण्याची अडत्यांकडून साठवणूक करून, त्याला पॉलिश करून तो पुन्हा विकला जातो. तासगाव बाजार समितीत महिन्यातील सौद्यांत पाच ते सात हजार टन बेदाण्याची उधळण होत असते. या उधळणीतून वर्षाला सात कोटींचा मलिदा अडत्यांना मिळतो. सांगली, विजापूर, पंढरपूर बाजार समित्यांतही हेच होते. चार बाजार समित्यांत मिळून महिन्याला सरासरी दीडशे टन बेदाण्याची उधळण होते. अडत्यांची नाराजी घेतली, तर पैसे वेळेवर मिळणार नाहीत, या भीतीतून शेतकरी तक्रार करीत नाहीत. तक्रार नसल्यामुळे बाजार समिती कारवाई करीत नाही.
कोट
बाजार समितीने सातशे ग्रॅमची तूट आकारण्यात यावी, असा नियम तयार केला आहे. जादा तूट आकारणी केली जात असेल तर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे लेखी तक्रार करायला हवी.
- नवनाथ मस्के, सभापती, बाजार समिती, तासगाव.
कोट
सांगली आणि तासगाव बाजार समितीतील लुटीविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी सातशे ग्रॅमपेक्षा जास्त तूट न धरण्याचा निर्णय झाला होता. तो कागदावरच आहे. जास्त तुटीविरोधात अडत्यांना हिसका दाखविणार आहोत. उधळण झालेला माल अडत्यांच्या ताब्यातच दिला जाऊ नये, यासाठी प्रयत्न करू.
- महेश खराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
चौकट
विक्रीची रक्कम दीड महिन्यानेच
बेदाणा उत्पादकांना अडत्यांकडून द्राक्षछाटणीसाठी उचल दिली जाते. मात्र नंतर बेदाणा विकल्यावर दिलेल्या रकमेवर महिन्याला दोन टक्क्यांप्रमाणे व्याज वसूल केले जाते. बेदाणा विकल्यावर २१ दिवसांत पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र दीड महिन्यापर्यंत ते मिळत नाहीत. लवकर मागणी केली, तर त्याच्या रकमेतून दोन टक्के रक्कम कपात केली जाते.