घनशाम नवाथेसांगली : जिल्ह्यात गेल्या चार आठवड्यांत सहा जणांचा खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे. यापैकी दोन गुंडांचा वैमनस्यातून खून झाला असून, तर चार खून वेगवेगळ्या कारणांतून झाले आहेत. सहा खून, तसेच काही ठिकाणी खुनी हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे ‘भय इथले संपणार तरी कधी?’ असा सवाल विचारला जात आहे. वाढत्या गुंडगिरीविरोधात पोलिस आणखी कठोर पाऊल उचलणार कधी? याकडे लक्ष लागले आहे.इस्लामपूर येथे भरदिवसा बाजारात गुंडाचा खून झाला. याप्रकरणी दोघांना तातडीने अटक केली; परंतु भरदिवसा अनेकांनी हा थरार पाहिला, त्यांचा थरकाप उडाला. या खुनापूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून इस्लामपूर येथे आणखी एका तरुणाचा खून झाला. कुपवाडजवळील सावळी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर नदाफ याचा पूर्ववैमनस्यातून खून झाला. मिरजेत मजुराचा त्याच्या मित्रानेच डोक्यात दगड घालून खून केला. बेडग (ता. मिरज) येथे हॉटेलचालकानेच एकाला बेदम मारल्याने तो मृत झाला. त्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला. रेवनाळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना घडली.एकीकडे सहा खुनांची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत झाली असतानाच खुनी हल्ल्याचे प्रकारही आष्टा, मिरज, इस्लामपूर, बुधगाव, कवठेपिरान आदी ठिकाणी घडले. त्यामुळे नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झाली आहे. पूर्ववैमनस्यातून गुंडच एकमेकांना संपवत असले तरी यातून नवीन गुन्हेगारही उदयास येत आहेत. त्यामुळे भविष्यात गुंडगिरी फोफावू शकते.रेवनाळ येथील पत्नीचा केलेला खून वगळता इतर पाच खून वेगवेगळ्या वादातूनच झाले आहेत. पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वातून हे खून झाले आहेत. तसेच खुनी हल्ले देखील पूर्वीच्या वादातूनच झाले आहेत. त्यामुळे ही गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. चार आठवड्यांतील या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कारवाईत सातत्य हवेरेकॉर्डवरील गुन्हेगारांवर, तसेच पोलिस ठाणे हद्दीतील हालचालीवर पोलिसांचे सातत्याने लक्ष हवे. गुन्हेगारांना सतत कायद्याचा धाक राहिला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांना सतत कारवाईच्या धाकात ठेवले पाहिजे. तरच त्यांच्या हालचाली थंडावतील.
हद्दपारी, स्थानबद्ध, मोकाच्या कारवाया हव्यातरेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या कारवाया वाढल्या पाहिजेत. हद्दपारीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार स्थानबद्धतेच्या कारवाया वाढल्या पाहिजेत. ‘मोका’च्या कचाट्यात गुन्हेगारांना जखडले पाहिजे. तरच त्यांच्यावर आणि साथीदारांवर वचक निर्माण होईल.
नशेखोरांचे अड्डे उद्ध्वस्त कराजिल्ह्यातील टास्क फोर्सने नशेखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे; परंतु अद्यापही गांजा, नशेच्या गोळ्यांची विक्री काही थांबलेली नाही. त्यामुळे नशेखोरीच्या मुळाशी जाऊन या गोष्टी सहजपणे मिळणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण नशा करून खून केल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.