सहा कोटीचे व्यवहार ठप्प
By Admin | Updated: August 22, 2014 00:53 IST2014-08-22T00:46:26+5:302014-08-22T00:53:28+5:30
एलबीटी प्रकरण : कर भरण्यासाठी पालिकेकडे गर्दी

सहा कोटीचे व्यवहार ठप्प
सांगली : महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती सील केल्याने या व्यापाऱ्यांचे सुमारे पाच ते सहा कोटीचे व्यवहार थांबले आहेत. बहुतांश बँकांनी या व्यापाऱ्यांची खाती गोठविली आहेत. पालिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आज (गुरुवारी) दिवसभरात कराचा भरणा करण्यासाठी व्यापाऱ्यांची रीघ लागली होती. उपायुक्त व एलबीटी कार्यालयात नोंदणी व बँक चलनासाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी शंभर व्यापाऱ्यांची खाती गोठविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
तब्बल दीड वर्षानंतर महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी प्रथमच आक्रमक पवित्रा घेत ३५ व्यापाऱ्यांची खाती सील करण्याचे आदेश विविध बँकांना दिले. या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती विक्रीकर विभागाकडून घेण्यात आली होती. पालिकेचे पत्र मिळताच बहुतांश बँकांनी व्यापाऱ्यांच्या खात्यावरील व्यवहार थांबविले आहेत, तर काही बँकांनी प्रक्रिया सुरू केली आहे. बँकांना खाती सील करण्याची नोटीस दिल्यानंतर पालिकेने संबंधित व्यापाऱ्यांनाही नोटीस बजाविली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांचे सुमारे पाच ते सहा कोटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पालिकेने आणखी शंभर व्यापाऱ्यांची यादी तयार केली आहे. यात एलबीटीची नोंदणी व कर भरणा न केलेल्यांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांची खाती सील करण्याचे आदेश आयुक्तांच्या सहीने तयार करण्यात आले आहेत. येत्या चार दिवसात स्वतंत्र पथके तयार करून ही खाती सील करण्याच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत.
महापालिकेने बँक खाती सीलचे आदेश दिल्याने व्यापाऱ्यांत खळबळ उडाली. गुरुवारी दिवसभर एलबीटी व उपायुक्तांच्या कार्यालयात व्यापाऱ्यांची रीघ लागली. उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या कार्यालयात अनेक व्यापाऱ्यांनी संपर्क साधून कर भरण्याचे चलन नेले. एलबीटी कार्यालयातूनही शंभरहून अधिक व्यापाऱ्यांनी कर भरण्यासाठी बँक चलन नेले आहे. त्याचवेळी नोंदणी न केलेल्या व्यापाऱ्यांची अर्ज नेण्यासाठी धावपळ सुरू होती. एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी नोंदणी व कर भरणारे, नोंदणी करूनही कर न भरणारे, अशा द्विस्तरीय पातळीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येत्या काही दिवसांत आणखी व्यापाऱ्यांना सुनावणीसाठी नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)