पेडमध्ये सीताफळाची सहा एकर बाग उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:30 IST2021-09-21T04:30:02+5:302021-09-21T04:30:02+5:30
तासगाव : तालुक्यातील पेड येथील जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांचे थोरले बंधू सचिन शिवाजी शेंडगे यांच्या ...

पेडमध्ये सीताफळाची सहा एकर बाग उद्ध्वस्त
तासगाव : तालुक्यातील पेड येथील जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांचे थोरले बंधू सचिन शिवाजी शेंडगे यांच्या सहा एकर शेतात नवीन लावण करण्यात आलेल्या सीताफळाची ४ हजार २०० झाडांची नासधूस केली. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शेंडगे यांचे जवळपास १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत तासगाव पोलिसांत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर सचिन शेंडगे यांची सहा एकर शेती आहे. या शेतात दहा दिवसांपूर्वी फुले, पुरंदर, सासवड, सीडलेस या वाणांची ४ हजार २०० सीताफळ झाडांची लावण केली होती. या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक करण्यात आले होते. सोमवारी पहाटेच्या वेळी समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे फेरफटका मारण्यासाठी शेतात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी संपूर्ण शेतात जाऊन पाहणी केली असता सहा एकर शेतात नुकतीच लावण केलेली सीताफळाची रोपे रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी मुळासह उपसून टाकली होती. शेतातील ठिबकच्या पाईप जागोजागी कापून टाकण्यात आल्या होत्या, तर ठिबक जोडण्यासाठी करण्यात आलेल्या पीव्हीसी पाईपवर मोठे दगड घालून फोडण्यात आल्या होते. याबाबत सचिन शेंडगे यांनी तासगाव पोलिसांत तक्रार दिली. तलाठी सुशांत कांबळे, कृषी सहायक एस. एस. कोरटे, ग्रामविकास अधिकारी ए. एम. खरमाटे यांनी जागेवर जाऊन पंचनामा केला. पोलीस हवालदार जोंजाल, पोलिसांनी श्वान पथकाद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला; पण श्वान परिसरात घुटमळले.