शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीत मूक पदयात्रा-तीस वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 18:47 IST2018-03-17T18:47:20+5:302018-03-17T18:47:20+5:30
सांगली : शिवप्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून सांगलीत शनिवारी मूकपदयात्रा काढण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी उपवास व आवडीच्या वस्तूंचा त्याग

शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीत मूक पदयात्रा-तीस वर्षांची परंपरा
सांगली : शिवप्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून सांगलीत शनिवारी मूकपदयात्रा काढण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी उपवास व आवडीच्या वस्तूंचा त्याग करून धर्मवीर मास पाळला होता. या धर्मवीर बलिदान मासचाही समारोप यानिमित्ताने करण्यात आला.
माघ अमावास्या ते फाल्गुनी अमावास्या असे तीस दिवस धर्मवीर मास पाळण्यात येतो. गेल्या तीस वर्षांपासूनची श्रीशिवप्रतिष्ठानची ही परंपरा आजही सुरू आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मारुती चौकात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमा झाले. बाळासाहेब बेडगे आणि शशिकांत नागे यांच्याहस्ते धर्मवीर ज्वालेचे प्रज्वलन करून मूक पदयात्रेस सुरुवात करण्यात आली. मारुती चौक, गणपती पेठ, पटेल चौक, राजवाडा चौक, बदाम चौक, वेलणकर मंगल कार्यालय, पंचमुखी मारुती रस्ता, बापट बाल शाळा, गावभागमार्गे पुन्हा मारुती चौक येथे पदयात्रा आली. त्यानंतर संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला नागे यांच्याहस्ते भडाग्नी देण्यात आला. याठिकाणी कार्यकर्त्यांनी ध्येयमंत्र व संभाजी महाराजांचे श्लोक म्हणून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी अविनाशबापू सावंत, प्रतीक पाटील, लक्ष्मणराव मंडले, संजयबापू तांदळे, प्रदीप पाटील, मिलिंद तानवडे, अंकुशराव जाधव, प्रशांत गायकवाड, आनंद चव्हाण, राहुल बोळाज, अक्षय पाटील, सचिन मोहिते, प्रसाद रिसवडे, सुनील बेळगावे, शीतल नागे आदी उपस्थित होते.
कडक उपवास
धर्मवीर संभाजी मासनिमित्त सर्व कार्यकर्ते स्वत:ला आवडणाऱ्या वस्तू, पदार्थ यांचा त्याग करतात. अनवाणी चालणे, उपवास करणे, गोडधोड वस्तू खाणे बंद करणे, मुंडण करणे आदी गोष्टी केल्या जातात. या माध्यमातून महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा सांगलीत सुरू आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही हा मास पाळण्यात येतो.