मिरज शहरातील प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:14+5:302021-05-07T04:29:14+5:30
मिरज : मिरजेत लाॅकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीमुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य होते. विनाकारण फिरणारे नागरिक, वाहनधारकांवर पोलीस अधीक्षकांनी दंडात्मक ...

मिरज शहरातील प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट
मिरज : मिरजेत लाॅकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीमुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य होते. विनाकारण फिरणारे नागरिक, वाहनधारकांवर पोलीस अधीक्षकांनी दंडात्मक कारवाई केली. शहरातील मुख्य रस्त्यावरून येणार्या - जाणार्यांना पोलीस अडवत चाैकशी करीत असल्याने वाहनधारकांना चाप बसला होता.
कोराेना संसर्ग रोखण्यासाठी शहरात लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. मिरजेतील सर्व बाजारपेठा बंद होत्या. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरताना सापडलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली. शहरात हिरा हॉटेल चौक, शास्त्री चौक, सिद्धार्थ चौक, मिरज हायस्कूल, गाडवे चौक, सराफ कट्टा चौक, लक्ष्मी मार्केट चौकातील रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले आहेत.
पोलीस अडवत चाैकशी करीत असल्याने अंतर्गत रस्त्यावरून वाहनांची ये-जा बंद होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी पालनासाठी सर्वांना घरी बसविण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त होता. नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणार्यांवर कारवाई सुरू केल्याने गुरुवारी रस्त्यावर शुकशुकाट होता. शनिवार पेठ, सोमवार पेठ, मार्केट हायस्कूल रोड, स्टेशन रोड परिसरात बाजारपेठा बंद होत्या. रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते गायब होते. रिक्षा व बसवाहतूक बंद होती. शहरातील रुग्णालये व औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद होते.