एसटीच्या दारी कर्मचाऱ्यांची कमतरता भारी...
By Admin | Updated: April 28, 2015 00:18 IST2015-04-27T23:15:37+5:302015-04-28T00:18:43+5:30
वाहक-चालकांवर ताण : जिल्ह्यात चालक, वाहक, कर्मचाऱ्यांची ११७४ पदे भरण्याची गरज

एसटीच्या दारी कर्मचाऱ्यांची कमतरता भारी...
नरेंद्र रानडे- सांगली -‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन गावोगावी धावणाऱ्या सांगलीच्या एसटी विभागात सध्या तब्बल ११७४ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मागील काही महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असतानाही, अतिरिक्त ताण सहन करुन वाहक - चालक, प्रवाशांना त्रास नको, या एकाच हेतूने संपाचे हत्यार न उपसता कार्यरत आहेत. सध्या सुट्टीचा कालावधी असल्याने आणि अपुऱ्या संख्येमुळे कित्येक कर्मचारी दिवसातील १५ तासांहून अधिक काळ सेवा बजावत आहेत. अतिरिक्त ताणामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी तातडीने वाहक - चालक यांची भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे.
एसटीसाठी वर्षातील सुट्टीचा कालावधी हा आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठीचा उत्तम काळ असतो. सध्या १५ एप्रिल ते १५ जून २०१५ हा कार्यकाल प्रवासी वाढीचा असल्याचे विभागाने जाहीर केले आहे. यामध्ये एसटीचे उत्पन्न वाढत असल्याने साहजिकच कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडू नये याची काळजी महामंडळाने घेतली पाहिजे. नेमक्या त्याच मुद्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सांगली विभागात दहा डेपो असून त्यामध्ये ९०७ एसटी आहेत. त्यातील बहुतांशी एसटीचा प्रवास सुमारे नऊ लाख कि.मी. झाला आहे. जुन्या नियमानुसार दहा लाख कि.मी. प्रवास झालेल्या एसटी गाड्या बदलणे गरजेचे आहे. तसेच नवीन नियमानुसार ही मर्यादा बारा लाख कि.मी. आहे. आताच काही एसटी गाड्या खराब होण्याच्या मार्गावर आहेत. साहजिकच नजीकच्या काळात बहुतांशी एसटीश बदलणे क्रमप्राप्त आहे. महामंडळाने केवळ तीस नवीन एसटी सांगली आगारात दाखल केल्या आहेत, तर कामगार संघटनांची, अजून दोनशे एसटी गाड्या मिळाव्यात अशी मागणी आहे.
दिवसेंदिवस प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याने पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, शेगाव, नांदेड, कोल्हापूर आदी ठिकाणी जाण्याकरिता एसटीच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. परंतु वाहक - चालकांची संख्या मर्यादित असल्याने महामंडळाकडून त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे जादा काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे. वास्तविक दिवसातून आठ तासच काम करण्याचा नियम असताना, सध्या अपुरे असलेले वाहक - चालक हे दिवसातून १५ तासाहून अधिक काळ काम करीत आहेत. या दोन महिन्याच्या काळात कोणाला सुट्टी हवी असल्यास, ती देण्यासही टाळाटाळ करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
खासगी प्रवासी बसेसशी स्पर्धा करण्याकरिता प्रवाशांना लवकरात लवकर इच्छितस्थळी पोहोचवणे गरजेचे आहे. परंतु स्पिड लॉक केल्यामुळे याला मर्यादा येत आहेत. याकरिता स्पिड लॉक काढण्याची देखील कर्मचाऱ्यांची मागील दहा वर्षापासूनची मागणी आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांकरिता आवश्यक असणाऱ्या रेस्ट रुममध्ये देखील आवश्यक असणाऱ्या सुविधा नाहीत. महिलांसाठी नवीन रेस्ट हाऊस बांधण्यासाठी एसटी महामंडळाने दहा लाख रुपये मंजूर केले असले तरी, मनपाने बांधकाम परवाना न दिल्याने ते काम रखडले आहे. यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. सध्या तातडीने एसटीमध्ये वाहक - चालक आणि कार्यशाळा कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविल्यास कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
सध्या एसटी चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याची गरज आहे.
- बिराज साळुंखे, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना सांगली.
सांगली विभागात महिला कार्यरत असूनही त्यांच्यासाठी रेस्ट रुममध्ये आवश्यक सुविधा नाहीत. बसस्थानकापासून ते काही अंतरावर असल्याने रात्रीच्या वेळी त्याचा उपयोग होत नाही. प्रस्तावित रेस्ट हाऊस तातडीने झाल्यास महिला कर्मचाऱ्यांची सुविधा होणार आहे.
- रोहिणी सबनीस, वाहतूक नियंत्रक, सांगली बसस्थानक