पत्नीच्या निधनाचा असह्य धक्का, अंत्यविधीनंतर अवघ्या पाच तासातच पतीचेही हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 18:10 IST2022-01-13T17:48:39+5:302022-01-13T18:10:00+5:30
अवघ्या पाच तासांच्या अंतराने पती-पत्नीचे निधन झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

पत्नीच्या निधनाचा असह्य धक्का, अंत्यविधीनंतर अवघ्या पाच तासातच पतीचेही हृदयविकाराने निधन
वाळवा : वाळवा येथील माळभाग परिसरात पहाटे पत्नीचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीनंतर अवघ्या पाच तासातच पतीचेही हृदयविकाराने निधन झाले. बाळाबाई हिंदुराव माळी (वय ६५) व हिंदुराव जगन्नाथ माळी (वय ७०) असे या दांपत्याचे नाव आहे. त्यांच्या निधनाने परिवारास मोठा धक्का बसला आहे.
बुधवारी पहाटे बाळाबाई हिंदुराव माळी यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी हाळभाग येथील माळी स्मशानभूमीत करण्यात आला. यावेळी त्यांचे पती हिंदुराव जगन्नाथ माळी उपस्थित होते. अंत्यविधीनंतर ते घरी आले. पत्नीच्या निधनाचा त्यांना असह्य धक्का बसला.
त्यांना अस्वस्थ वाटू लागले. म्हणून खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचे उपचारादरम्यान सकाळी साडेनऊ वाजता निधन झाले. अवघ्या पाच तासांच्या अंतराने पती-पत्नीचे निधन झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
येथील क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी दूध संस्थेचे सचिव संतोष तथा मनोज माळी यांचे ते चुलते व चुलती होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.