शिवसेनेचा राजकीय दुष्काळ संपविणार
By Admin | Updated: August 23, 2014 00:07 IST2014-08-23T00:00:44+5:302014-08-23T00:07:03+5:30
उद्धव ठाकरे : पंधरा वर्षांत ‘कृष्णा खोरे’चा बट्ट्याबोळ

शिवसेनेचा राजकीय दुष्काळ संपविणार
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने कधीही शिवसेनेला आशीर्वाद दिलेला नाही. दरवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली, पण आघाडी सरकारने जनतेला काय दिले, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. आघाडीच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पडले असून, आगामी विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा राजकीय दुष्काळ संपविणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, शुक्रवारी विटा येथील जाहीर मेळाव्यात केले.
राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानिमित्त विट्यातील महात्मा गांधी हायस्कूलच्या मैदानावर जाहीर मेळावा झाला. या मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र हा शिवसेनेसाठी राजकीय दुष्काळी भागच राहिला आहे, तरीही आम्ही दुजाभाव केला नाही. संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, या भावनेतून युती शासनाच्या काळात काम केले. मात्र म्हैसाळ, टेंभूसह कृष्णा खोरे महामंडळाच्या योजना अजूनही कागदावरच आहेत. या योजना अर्धवट का आहेत, याचा जाब टगेगिरी करणाऱ्यांना विचारा.
कराडमध्ये मुख्यमंत्र्यांची पोस्टर लावली आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांनी काय निर्णय घेतले? सांगली जिल्ह्यात तीन वजनदार मंत्री आहेत. सांगलीचे सोने व्हायला हवे होते, पण या मंत्र्यांनी ‘मी आणि माझे’ एवढ्यापुरताच विचार केला. त्यांनी स्वत:च्या संस्था मोठ्या केल्या. भूखंड ढापून ते / सहकारसम्राट झाले. जनता काहीशी बाजूला झाली तर हेच सहकारसम्राट रस्त्यावर येतील, अशी टीकाही त्यांनी तिन्ही मंत्र्यांवर केली.
ते म्हणाले की, जत तालुक्यातील जनतेने पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची घोषणा केली. मी दुसऱ्याच दिवशी जतमध्ये येऊन जनतेला विश्वास दिला होता. जिल्ह्यातील एकही मंत्री त्यांना धीर देण्यासाठी गेला नाही. या मंत्र्यांनी बादलीभर पाण्यात जीव द्यायला हवा होता. युती शासनाने दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी टेंभूला मंजुरी दिली. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने कृष्णा खोरे मंडळाचा बट्ट्याबोळ केला आहे. हे सरकार आता शेवटची घटका मोजत आहे. त्यांना पाजायला पाणीही मिळणार नाही. टेंभू प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर महायुतीचे सरकार सत्तेत आणले पाहिजे. सभा, मोर्चांद्वारे योजना पूर्ण होणार नाही. त्यासाठी सरकार बदलण्याचेच आंदोलन करावे लागले. राज्यातील सत्ता महायुतीच्या हाती दिल्यास अपूर्ण प्रकल्प पूर्ण करू
बाळासाहेब ठाकरे यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याची भूमिका पूर्वीच मांडली आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे. आम्ही हिंदू आहोत, हे सांगण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. हिंदंूच्या सणांवर बंदी येत आहे. तोंडात बोळा आणि हात बांधून आम्ही सण साजरे करायचे का? हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू आहे. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. दोन महिन्यांतच युतीचे शासन येणार आहे. त्यामुळे कुणीही भगव्याच्या वाटेला जाऊ नये, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
अनिल बाबर म्हणाले की, राष्ट्रवादीची सर्व पथ्ये पाळून काम केले. वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडल्याची टीका काहीजण करीत आहेत, पण त्यांना व त्यांच्या टीकेला मी घाबरत नाही. त्यांच्या सत्तेचा मी लाभधारक नाही. कधीही आमदारकी, महामंडळ मागितले नाही. केवळ जनतेच्या प्रश्नासाठी त्यांच्या दारात जात होतो. टेंभू प्रकल्प आघाडीच्याच काळात रखडला आहे. अनेकदा अनुशेषाचा मुद्दा पुढे आणला गेला, पण त्यांच्या मतदारसंघात काम सुरू झाले की अनुशेषाचा प्रश्न कुठे जात होता? दोन वर्षांत टेंभू पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या मागे शक्ती उभी करा. आटपाडी-खानापूरमधून मला उमेदवारी द्यावी, अशी अट नाही, पण टेंभूचे पाणी शिवारापर्यंत पोहोचल्यानंतर जनतेच्या
चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, उपप्रमुख शिवाजी शिंदे, आप्पासाहेब काटकर, नितीन बानुगडे-पाटील, उपसभापती सुहास बाबर, युवानेते अमोल बाबर, जि. प.चे सदस्य फिरोज शेख, नगरसेवक अनिल म. बाबर, अॅड. विनोद गुळवणी, बबनराव भगत, रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, कडेगाव तालुकाप्रमुख सुभाष मोहिते, दिलीप बागल, संजय विभूते, बाळासाहेब लकडे, सुशांत देवकर, सुनीता मोरे, राजश्री शिंदे, शुभांगी कुलकर्णी, अॅड. विनोद गोसावी, उत्तम चोथे उपस्थित होते. (प्रतिनिधी)