शिवप्रतिष्ठानच्या आंदोलनास परवानगी नाकारली, मोठा पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 19:12 IST2021-11-16T19:11:42+5:302021-11-16T19:12:42+5:30
राज्यातील दंगलीच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने आंदोलनाचा बेत आखण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारत आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याने कार्यकर्त्यांना आंदोलन रद्द करावे लागले.

शिवप्रतिष्ठानच्या आंदोलनास परवानगी नाकारली, मोठा पोलीस बंदोबस्त
सांगली : राज्यातील दंगलीच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी सकाळी आंदोलनाचा बेत आखण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारत सकाळपासून आंदोलनस्थळी बंदोबस्त लावल्याने कार्यकर्त्यांना आंदोलन रद्द करावे लागले.
राज्यात अमरावती, नांदेड या शहरांमध्ये झालेल्या दंगलींच्या घटनांचा निषेध शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केला होता. याच बैठकीत घटनेविरोधात मंगळवारी सकाळी दहा वाजता मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दंगलीच्या घटनांचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंदोलनाची तयारी कार्यकर्त्यांनी केली असताना सकाळी आठ वाजल्यापासून पोलिसांनी आंदोलनस्थळी मोठा बंदोबस्त लावला. आंदोलन न करण्याची सूचना संभाजीराव भिडे व त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. तरीही आंदोलन होईल, अशी शक्यता वाटत असल्याने पोलिसांनी दिवसभर येथे बंदोबस्त कायम ठेवला. त्यामुळे कार्यकर्ते आंदोलन करण्यास आले नाहीत.
राज्यात ठिकठिकाणी झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सांगली जिल्ह्यात दक्षता घेतली आहे. सोशल मीडियावर वॉच ठेवतानाच शहरात ठिकठिकाणी संचलन सुरु करण्यात आले आहे. याच प्रश्नावर शिवप्रतिष्ठानने आंदोलन ठेवल्याने पोलिसांनी परवानगी नाकारत आंदोलन होऊ दिले नाही. मंगळवारीही सांगलीत पोलिसांनी संचलन केले.