नागपंचमीसाठी शिराळा सज्ज
By Admin | Updated: July 31, 2014 00:19 IST2014-07-31T00:14:57+5:302014-07-31T00:19:43+5:30
तयारी पूर्ण : न्यायालयाच्या आदेशाबद्दल नाराजी

नागपंचमीसाठी शिराळा सज्ज
शिराळा : शिराळा येथे शुक्रवार दि. १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जगप्रसिध्द नागपंचमीसाठी शिराळा शहर तसेच प्रशासन सज्ज झाले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे शिराळावासीयांत नाराजी आहे.
२00२ पासून नागपंचमीविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यामुळे जिवंत नागपूजा व प्रतिकात्मक नागाची मिरवणूक अशी नागपंचमी साजरी केली जात होती. मंगळवार दि. १५ जुलै रोजी या जनहित याचिकेवर निकाल लागला. जिवंत नाग पकडणे, पूजा करणे याला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे शहरवासियांत नाराजी पसरली आहे. या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात स्थगिती याचिका दाखल केली आहे. नागपंचमी कालावधित काही दिवसांकरिता वन्यजीव कायदा शिथिलता मिळविण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत.
ही नागपंचमी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साजरी करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने वन विभागामार्फत देखरेख करण्यासाठी ‘पथके’ तयार केली आहेत. तसेच पोलीस खात्यानेही तयारी केली आहे. शिराळा शहरातील नाग स्टेडियमजवळ मोठ्या प्रमाणात फळे, मिठाई, स्टेशनरी विक्रेते, हॉटेल्स दाखल झाली आहेत. तसेच मनोरंजनासाठी मिनी ‘एस्सेल वर्ल्ड’ बसविले आहे. महिला वर्ग घरातील स्वच्छता, पाहुण्यांच्या स्वागतासाठी विविध खाद्यपदार्थ करण्यात व्यस्त आहे.
ग्रामपंचायतीमार्फत शहरातील तसेच मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात येत आहे. भाविकांना पाणी, वाहने पार्किंग याचे काम ग्रामपंचायतीने चालू केले आहे. एसटी महामंडळामार्फत जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. (वार्ताहर)