शिराळ्यात ‘पीएम किसान’च्या अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:27+5:302020-12-11T04:53:27+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यातून पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांपैकी ३०५ लाभार्थ्यांच्या खात्यावर गेल्या एक महिन्यात एकूण २३ लाख ...

शिराळ्यात ‘पीएम किसान’च्या अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल होणार
शिराळा : शिराळा तालुक्यातून पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांपैकी ३०५ लाभार्थ्यांच्या खात्यावर गेल्या एक महिन्यात एकूण २३ लाख रुपये जमा केले आहेत. शिराळा तालुक्यात एकूण सातशे अपात्र लाभार्थी सापडले आहेत. त्यांच्याकडून एकूण रक्कम ५९ लाख रुपये वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले की, केंद्र सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अपात्र लाभार्थी आढळले आहेत. विशेष म्हणजे नावावर जमीन नसलेल्यांपासून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळले असून, त्यांच्याकडून तब्बल ५१ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी या योजनेची घोषणा केली होती. पीएम किसान योजनेअंतर्गत त्यांना दरवर्षी सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा केले जातात. अनेक ठिकाणी पती-पत्नी आणि १८ वर्षावरील अपत्ये लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले होते, असे सांगितले. यावेळी निवासी नायब तहसीलदार अरुण कोकाटे, नायब तहसीलदार व्ही. डी. महाजन आदी उपस्थित होते.