जयंतरावांच्या विरोधात दोघांनी ठोकला शड्डू...
By Admin | Updated: August 26, 2014 23:56 IST2014-08-26T23:22:10+5:302014-08-26T23:56:30+5:30
विधानसभा निवडणूक : वर्चस्वाचे प्रदर्शन

जयंतरावांच्या विरोधात दोघांनी ठोकला शड्डू...
अशोक पाटील - इस्लामपूर मतदारसंघात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात महायुतीतील कोणत्याही घटकपक्षाला जागा मिळो, आपण निवडणूक लढविणारच, अशी भूमिका नानासाहेब महाडिक यांनी घेतली आहे, तर नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले भीमराव माने यांनीही जयंतरावांविरोधात शड्डू ठोकला आहे. दरम्यान, डिग्रज मंडलातील आठ गावात जयंत पाटील यांनी आघाडी घेतल्यास राजकीय संन्यास घेऊ, असा निर्धार माने यांनी केला आहे.
भीमराव माने म्हणाले की, जयंतराव हे विश्वासघातकी राजकारण करतात. त्यांच्याजवळ जे जे गेले, त्यांचा त्यांनी फक्त वापर करुन घेतला आहे. त्यामुळे सर्व नाराज मंडळी जयंत पाटील यांच्याविरोधात एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादीविरोधात जिल्ह्यात हवा आहे. याचाच फायदा महायुतीला होणार आहे. जयंत पाटील यांनीच मला शिवसेनेत पाठविले आहे, अशी चर्चा त्यांचेच समर्थक करीत आहेत. मी जयंत पाटील यांचा चेला नाही. राजकारणात मला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच काही कानमंत्र दिले आहेत. जयंत पाटील यांनी फक्त आश्वासनांपलीकडे काहीही दिलेले नाही. मी शिवसेनेत गेल्यानंतरच स्मारकासाठी त्यांनी निधी जाहीर करून त्याचे श्रेयही लाटले आहे. माझ्या पक्षबदलाच्या निर्णयाने जयंत पाटील आता आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी डिग्रज मंडलातील आठ गावांतून त्यांना आघाडी मिळू देणार नाही. जर त्यांना मतांची आघाडी मिळाली, तर राजकीय संन्यास स्वीकारु, असेही माने यांनी स्पष्ट केले.
याउलट महायुतीत मात्र अजूनही शांतताच आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या घोळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कमी जागा मिळणार असल्याने त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, त्यांच्यापुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातच नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक यांनी मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना राजकारणातून हद्दपार करण्याचा विडा उचलला होता. परंतु यात त्यांना यश मिळाले नाही. त्याचवेळी राजू शेट्टी यांनी, विधानसभेला जयंत पाटील यांना हिसका दाखविणारच, असा इशारा दिला आहे. त्यामुळे इस्लामपूर विधानसभेची निवडणूक ही शेट्टी व जयंतरावांच्या प्रतिष्ठेचीही बनणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु अद्यापही महायुतीतील नेत्यांच्यात एकसंधपणा नसल्याने, राजू शेट्टी यांचा विरोध कितपत टिकेल्, याबाबत येणारा काळच सांगेल.