लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या वर्षभरापासून कुरबुरी सुरू होत्या, पण भाजप नेते व कोअर कमिटीने त्याची दखल घेतली नाही. नेमका त्याचाच फायदा राष्ट्रवादीने उचलला. भाजपच्या बारा नगरसेवकांना फोडण्यात यश मिळविले. त्यातील सात जणांनी अखेरपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहत महापालिकेतील भाजपच्या सत्तेचा ‘गेम’ केला. या नगरसेवकांची नाराजीच भाजप सत्तेच्या मुळावर घाव घालणारी ठरली.
महापालिकेत भाजपकडे ४१ नगरसेवकांचे बळ होते. त्याला दोन सहयोगी सदस्यांनी पाठिंबा दिल्याने भाजपच्या सत्तेचा वारू उधळला होता. त्यात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांनी स्वत:ला महापालिकेच्या राजकारणापासून अलिप्त ठेवले होते. सारा कारभार कोअर कमिटीच्या हातात होता. सत्तेवर येताच वर्षभरात कोअर कमिटीच्या नेत्यांनी आपल्याच नातेवाइकांना पदे दिली. तेव्हापासूनच कुरबुरींना सुरुवात झाली होती, पण कोअर कमिटीतील किंगमेकर, कारभाऱ्यांनी नगरसेवकांच्या असंतोषाची दखल घेतली नाही. उलट ‘हम करे सो कायदा’ या न्यायाने त्यांना वागणूक दिली. त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले होते. नेमकी हीच बाब राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हेरली. त्यांनी मैनुद्दीन बागवान यांना कामाला लावले. हळूहळू भाजपची नाराज मंडळी राष्ट्रवादीच्या तंबू दिसू लागली. पण तरीही भाजपच्या नेत्यांनी आंधळेपणाचे सोंग घेतले. नगरसेवक कुठे जातात, असाच त्यांचा अहंभाव होता.
त्यातून महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, नसिमा नाईक, अपर्णा कदम, विजय घाडगे, आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे हे सात नगरसेवक शेवटपर्यंत भाजपच्या हाताला लागले नाहीत. महेंद्र सावंत व स्नेहल सावंत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते. त्यामुळे ते सहजच राष्ट्रवादीच्या गळाला लागले. अपर्णा कदम पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या होत्या. त्यांना स्थायी समितीचे सदस्यपदही दिले होते, पण या काळात त्यांना कधीच सत्तेत आणि कामात वाटा मिळाला नाही. विजय घाडगे सहयोगी सदस्य असले तरी ते विशाल पाटील यांचे समर्थक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सत्तेचे गणित न जमल्याने ते भाजपसोबत आले होते. त्यांनाही सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे स्थायी समिती सभापतीपदासाठी दावेदार होते. त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसा शब्द दिला होता, पण अडीच वर्षांत कधीच त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. देवमाने यांना इच्छा नसतानाही उपमहापौरपद देण्यात आले, तर दुर्वे यांना पदापासून वंचितच ठेवले होते. सहा महिन्यांपासून त्यांनी उघडपणे भाजपविरोधी भूमिका घेतली होती. याशिवाय अनेक सदस्य नाराज होते. पण त्यांना भाजप नेत्यांनी बेदखल केले होते. ही नाराजीच भाजपला भोवली.
चौकट
दिग्विजय सूर्यवंशींना लाॅटरी
काँग्रेस-राष्ट्रवादीतही सारे आलबेल नव्हते. राष्ट्रवादीत महापौरपदासाठी मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत चुरस होती. नगरसेवकांच्या फोडाफोडीपासून ते त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यापर्यंत सारे नियोजन बागवान यांनी केले होते. त्यांच्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही आग्रह धरला होता. गेल्या बारा वर्षांत खुल्या गटातून महापौर झालेला नाही. त्यात नवीन चेहरा द्यावा, बागवान यांना महापौरपदाची संधी मिळाली आहे, असे मुद्दे समोर आले. अखेर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.