सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 19:03 IST2021-05-27T19:03:15+5:302021-05-27T19:03:51+5:30

मिरज, हरिपूर, कृष्णाघाट, बहे, भिलवडीतील निर्मिती थांबली, मिनी इंडस्ट्रीतील रोजगारही बुडाला

serials, film shooting teams migrated to Goa, Gujarat due to corona Virus lockdown | सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित

सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रीकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरित झाली आहेत. चित्रीकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.


गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मालिका आणि चित्रपटांची चित्रीकरणे मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. विशेषत: मराठी वाहिन्यांवरील मालिका व लो बजेट चित्रपटांची चित्रीकरणे सातत्याने कोठे ना कोठे सुरू असायची. कोरोनाच्या पहिल्या लाटेत निर्बंधांचे पालन करत छायाचित्रण सुरू राहिले होते. दुसऱ्या लाटेत निर्बंध कडक झाल्यानंतर निर्मात्यांनी गाशा गुंडाळला. गोवा, सिल्वासा, दिव, दमण आदी ठिकाणी स्थलांतर केले. तेथे निर्बंध शिथिल असल्याने, तसेच निसर्गसौंदर्याची स्थळे भरपूर असल्याने चित्रीकरण सोयीचे ठरले.


सांगलीत चित्रीकरणे थांबल्याने त्यातील रोजगारही थांबला. हॉटेल्स व लॉजमधील कलाकारांचे मुक्काम थांबले. सांगली-मिरजेत केटरिंग व्यावसायिकांकडून कलाकारांना जेवण पुरवले जायचे. त्याशिवाय कलाकारांची ने- आण करणारी वाहतूक, मालिकेत सहकलाकार म्हणून मानधनावर मिळणारी संधी, चित्रीकरणासाठी इमारत मालकांना मिळणारे भाडे, अशी मोठी उलाढाल व्हायची. हे सारे अर्थचक्र आता थंडावले आहे.


चित्रीकरणासाठी आवडती डेस्टिनेशन्स
कृष्णा आणि वारणा नद्यांचा परिसर, विविध गावांतील ऐतिहासिक वाडे, देखणे फार्महाउस, दंडोबाच्या डोंगररांगा, वाळवा तालुक्यात लांबच लांब पसरलेली फुलशेती ही काही डेस्टिनेशन्स निर्मात्यांना आकर्षित करायची. मिरजेतील कृष्णाघाटावर मालिका व गाण्यांच्या अल्बमची छायाचित्रणे अखंडपणे व्हायची. मिरजेचे भूतपूर्व संस्थानिक पटवर्धन सरकारांच्या बेडग रस्त्यावरील देवी भवनमध्ये, तर सुमारे वर्षभरापासून अखंडपणे एका मराठी मालिकेचे छायाचित्रण सुरू होते. वाळवा तालुक्यातील रामलिंग बहे, औदुंबर येथील दत्त देवस्थान, अंकली गावातील ऐतिहासिक वाडे, कवठेएकंद येथील सिद्धनाथ मंदिर, सांगलीत मिशन कंपाउंड, आयर्विन पूल, मालगावचा बावाफन दर्गा ही काही चित्रीकरण स्थळे निर्मात्यांच्या आवडीची ठरली होती.

Web Title: serials, film shooting teams migrated to Goa, Gujarat due to corona Virus lockdown