सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. होम आयसोलेशनची सोय नसलेल्या रुग्णांसाठी महापालिकेच्यावतीने सैनिक संकुलात विलगीकरणाची सोय करण्यात आल्याचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले.
रोकडे म्हणाले की, आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार सांगलीतील कर्मवीर चौकातील सैनिक संकुल परिसरात समूह विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी फक्त निवासाची सोय महापालिकेकडून करण्यात आली आहे. रुग्णांना लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक वस्तू त्यांनी स्वत: आणायच्या आहेत. तसेच त्यांच्या नातेवाईकांनी जेवणाची व्यवस्था करायची आहे. होम आयसोलेशनबाबत अनेक रुग्णांची अडचण आहे. अनेकांकडे स्वतंत्र राहण्याची सोय नाही. त्यामुळे अशांसाठी सैनिक संकुल येथील वसतिगृहात समूह विलगीकरणाची सोय केली आहे, असे रोकडे यांनी सांगितले.