शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील प्राज राजेंद्र पाटील (वय २०) या युवकासह लातूर येथील प्रज्ज्वल तेली आणि प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील चंद्रप्रकाश फुलचंद या तिघांना राजकोटच्या महिला रुग्णालयातील प्रसूतिगृहात जाणाऱ्या महिलांच्या वैद्यकीय तपासणीचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक केली आहे. रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा हॅक करून ‘टेलिग्राम’ सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘व्हिडिओ’ विकल्याप्रकरणी अहमदाबाद (गुजरात) पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात चिखलीतील प्राज पाटील याला अटक केल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की, शिराळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राज पाटील यास दि. १९ रोजी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात प्रज्ज्वल तेली हा मास्टरमाइंड आहे. प्राज पाटील हा तीन वर्षांपासून लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होता. त्यावेळी त्यांना अश्लील व्हिडिओ विकण्याची कल्पना सुचली. या दोघांनी इंटरनेटवर दोन ते चार हजार रुपयांना विकण्यासाठी महिलांचे व्हिडीओ मिळविले. राजकोट रुग्णालयातील महिलांच्या गोपनीयतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर अहमदाबाद सायबर गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली. यामध्ये लातूर येथून हॉस्पिटलची सीसीटीव्ही यंत्रणा हॅक करण्यात आल्याचे तांत्रिक तपासणीत निष्पन्न झाले.
यामध्ये तेलीने एका वर्षाहून अधिक काळ टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘व्हिडीओ’ वितरित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याने 'मेघा एमबीबीएस अंदा-मेन प्रोडक्शन' नावाचे एक यूट्यूब चॅनेल तयार केले आणि 'डे-मॉस टेलिग्राम ग्रुप' नावाचा ग्रुप चालविला. प्राज पाटील याने यास सहकार्य केले. टेलीग्राम समूह उघडण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांसाठी खाती करण्यासाठी प्रयागराज येथील भिंस गावचा रहिवासी असलेला फूलचंद 'सिपी मोंडा' नावाचे यू ट्यूब चॅनल चालवीत होता.संशयित आरोपी यूट्यूबवर टीझर क्लिप पोस्ट करत आणि जर दर्शकांनी पूर्ण व्हिडीओ पाहण्यात रस दाखवला तर ते त्यांना सामग्री विकत होते. या संशयित आरोपींनी खरेदीदारांना व्हिडीओ विकले. त्यात ॲटलान्टा, यूएस आणि रोमानिया येथील डिंग हॅकर्सचा समावेश आहे. आरोपींनी ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा हॅक करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर केल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी राजकोट रुग्णालयालाच का लक्ष्य करण्यात आले आणि तेथे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली महिलांवर नजर ठेवली जात असल्याची त्यांना माहिती होती का ? याचा तपास करत आहेत.
तिघांची कसून चौकशीप्रभारी अहमदाबाद पोलिस-उपायुक्त शरद सिंघल यांनी संशयितांनी भारतात आणखी काही शहरांमधील, सार्वजनिक ठिकाणे, रुग्णालये आणि इतर आस्थापनांचे ‘सीसीटीव्ही’ हॅक केले का? त्यांना किती व्हिडीओ मिळाले आणि त्यांपैकी किती व्हिडीओ त्यांनी विकले याचा तपास सुरू आहे. घोटाळ्याचे प्रमाण आणि त्याचे आर्थिक मूल्य आरोपींच्या तपशीलवार चौकशीनंतर पूर्णपणे निश्चित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्राज पाटीलने दिला बँकेचा तपशीलया प्रकरणात लातूरच्या प्रज्ज्वल तेलीने यूट्यूब चॅनेल आणि टेलिग्राम ग्रुप तयार केला. चिखलीच्या प्राज पाटील याने त्याचा मोबाइल नंबर आणि बँक खात्याचा तपशील ‘सबस्क्रायबर्स’ना दिला. चंद्रप्रकाश फुलचंदने व्हिडीओ अपलोडसाठी दुसरे एक यूट्यूब चॅनेल सुरू केले होते, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.